वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
सरबज्योत सिंग पुरुषांच्या 10 मी. एअर पिस्तुल नेमबाजीत कांस्यपदकांसह ऑलिम्पिक कोटा मिळविला तर कनिष्ठ महिला नेमबाज सैन्यमने कोरियातील चांगवोन येथे सुरू असलेल्या आशियाई नेमबाजी चॅम्पियनशिपमध्ये सुवर्णपदक पटकावले.
सरबज्योतने अंतिम फेरीत 221.1 गुण नोंदवत तिसरे स्थान मिळविले. चीनच्या झांग यिफानने (243.7) सुवर्ण व लियू जिनयावने (242.1) रौप्यपदक पटकावले. भारताला मिळालेला हा आठवा ऑलिम्पिक कोटा आहे. सरबज्योतने पात्रता फेरीत 581 गुण मिळवित आठ जणांच्या अंतिम फेरीत स्थान मिळविले होते. चीनने दोन ऑलिम्पिक कोटा याआधीच निश्चित केले होते आणि दोनपैकी एकच कोरियन नेमबाज अंतिम फेरीसाठी पात्र ठरला होता. त्यामुळे सरबज्योतला जोरदार फिनिश करण्याची गरज होती. नेमबाजीमध्ये प्रत्येक देशाला प्रत्येक स्पर्धेत फक्त दोनच ऑलिम्पिक कोटा मिळविता येतात.
अलीकडेच झालेल्या हांगझाऊ आशियाई क्रीडा स्पर्धेत पुरुषांच्या 10 मी. एअर पिस्तुल सांघिक प्रकारात सुवर्ण व मिश्र सांघिक प्रकारात रौप्य मिळविले होते. त्याने अंतिम फेरीत पहिल्या पाच शॉट्समध्ये महत्त्वाची आघाडी घेतली. पण चीनच्या दोन खेळाडूंनी त्याला गाठले आणि नंतर त्याला मागेही टाकले. सरबज्योतने संयम ढळू न देता अचूक नेमबाजी करीत पदक मिळविण्यात यश मिळविले. या प्रकारात अन्य भारतीय नेमबाजांनीही भाग घेतला होता. पण त्यांना अंतिम फेरी गाठण्यात यश आले नाही. त्यात वरुण तोमर (578), कुणाल राणा (577) यांनी अनुक्रमे 16 व 17 वे स्थान मिळविले तर शिवा नरवालने 576 गुणांसह 20 वे तर सौरभ चौधरीने 569 गुणांसह 35 वे स्थान मिळविले.
महिलांच्या 10 मी. एअर पिस्तुल प्रकारात भारताच्या एकाही नेमबाजाला अंतिम फेरी गाठता आली नाही. पात्रता फेरीत रिदम सांगवानने 577 गुणांसह 11 वे, ईशा सिंगने 13 वे, सुरभी रावने 15 वे, रुचिता विनेरकरने 22 वे व पलकने 25 वे स्थान मिळविले. मात्र फक्त सैन्यमने कनिष्ठ महिलांच्या 10 मी. एअर पिस्तुल प्रकाराच्या अंतिम फेरीत 240.6 गुण घेत गुण घेत सुवर्णपदक पटकावले. चीनच्या जिन बोहानचे कडवे आव्हान मोडून काढत तिने हे यश मिळविल्यानंतर भारतीय गोटात जल्लोषाचे वातावरण निर्माण झाले. बोहान केवळ 0.4 गुणांने मागे पडल्याने तिला रौप्य मिळविले. भारताच्या दृष्टी सांगवानला यामध्ये सातवे स्थान मिळाले.
पात्रता फेरीत सैन्यमने 578 गुण घेत दुसरे स्थान मिळविले होते. चीनच्या झुओ किंगयीनेही 578 गुण मिळविले होते. दृष्टीने 574 गुणांसह चौथे स्थान मिळविले होते









