वृत्तसंस्था/ हांगझाऊ, चीन
पॅराआशियाई क्रीडा स्पर्धेत विद्यमान पॅरालिम्पिक चॅम्पियन सुमित अँटिलने भालाफेकमध्ये सुवर्णपदक पटकावले. भालाफेक एफ64 प्रकारात त्याने 73.29 मी. भालाफेक करीत हे यश मिळविले.
25 वर्षीय सुमितने याआधीचा स्वत:चाच विश्वविक्रम मागे टाकत नवा विक्रम नोंदवला. याआधी त्याने 70.83 मी.चा विश्वविक्रम नोंदवला होता. याचवर्षी पॅरिसमध्ये झालेल्या वर्ल्ड पॅराअॅथलेटिक्स चॅम्पियनशिपमध्ये त्याने हा विक्रम नोंदवला होता. अन्य एक भारतीय खेळाडू पुष्पेंद्र सिंगने 62.06 मी. भालाफेक करीत कांस्य तर लंकेच्या समिथा आरच्छिगे कोडिथुवक्कूने 64.09 मी. भालाफेक करीत रौप्य मिळविले. सुमित अँटिलने टोकियो पॅरालिम्पिकमध्येही त्यावेळचा 68.55 मी. चा विश्वविक्रम नोंदवत सुवर्ण मिळविले होते. हांगझाऊ पॅराआशियाई स्पर्धेत भारताचा हे दहावे सुवर्णपदक असून भारताची एकूण पदके 36 झाली होती.









