300 किलो वजन वाहून नेण्यास सक्षम
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
अंतराळ क्षेत्रातील स्टार्टअप स्कायरूट एरोस्पेसने स्वदेशी विक्रम-1 रॉकेटची निर्मिती केली असून त्याचे नुकतेचे अनावरण करण्यात आले. पुढील वर्षाच्या सुऊवातीला या रॉकेटमधून उपग्रह पृथ्वीच्या खालच्या कक्षेत पाठवले जातील अशी अपेक्षा आहे. विक्रम-1 हे स्कायरूटचे दुसरे रॉकेट असून ते 2024 च्या सुऊवातीला प्रक्षेपित करण्याची योजना आहे. गेल्यावषी 18 नोव्हेंबरला विक्रम-एस रॉकेटचे यशस्वी प्रक्षेपण करण्यात आले होते.
स्कायरूट एरोस्पेस ही भारतातील पहिली रॉकेट लॉन्च करणारी खासगी कंपनी आहे. त्याचे मुख्यालय हैदराबाद येथे आहे. कंपनीची स्थापना इस्रोच्या माजी अभियंते आणि शास्त्रज्ञांनी केली होती. लहान उपग्रह प्रक्षेपणासाठी विशेषत: डिझाइwन केलेले लहान रॉकेट विकसित करणे आणि प्रक्षेपित करणे हे त्याचे ध्येय आहे. विक्रम-1 हे बहु-स्तरीय प्रक्षेपण वाहन आहे. कमी पृथ्वीच्या कक्षेत सुमारे 300 किलो पेलोड ठेवण्याची क्षमता आहे. विक्रम-1 हे ऑल-कार्बन-फायबर-बॉडी रॉकेट असून ते अनेक उपग्रहांना कक्षेत सोडू शकते आणि त्यात 3डी-प्रिंट केलेले द्रव इंजिन आहे.
अंतराळ क्षेत्रात भारताची कामगिरी सुसाट
केंद्रीय विज्ञान आणि तंत्रज्ञान राज्यमंत्री जितेंद्र सिंह म्हणाले की, भारत आता अंतराळ क्षेत्रात इतर देशांचे नेतृत्व करण्याच्या स्थितीत आहे. त्यांनी हैदराबादमधील जीएमआर एरोस्पेस आणि इंडस्ट्रियल पार्क येथे स्कायरूट एरोस्पेसच्या नवीन मुख्यालय ‘मॅक्स-क्मयू’ चे उद्घाटन केले. जितेंद्र सिंह यांनी 60 हजार स्क्वेअर फूट क्षेत्रात विस्तारलेल्या स्कायरूटच्या मुख्यालयालाही भेट दिली. एका छताखाली सुरू झालेली देशातील सर्वात मोठी खासगी रॉकेट विकास सुविधा म्हणून त्यांनी या प्रकल्पाचा गौरव केला. आज अंतराळ क्षेत्रात भारताकडे इतर देशांचे नेतृत्व करणारा देश म्हणून पाहिले जात आहे. आता आम्ही अंतराळ क्षेत्रातील इतर देशांना नेतृत्व देत आहोत. केंद्राच्या अवकाश क्षेत्राच्या नियंत्रणमुक्तीमुळे स्टार्टअपला गती मिळाली आहे. गेल्या काही वर्षातच स्पेस स्टार्टअपची संख्या 150 पेक्षा जास्त झाली आहे, असे जितेंद्र सिंह म्हणाले.









