वृत्तसंस्था / आग्रा
आग्रा येथील मालपुरा पोलीस ठाण्याच्या भदई रेल्वेस्थानकाजवळ पंजाबमधील फिरोजपूरहून मध्यप्रदेशातील सिवनीकडे जाणाऱ्या पातालकोट एक्स्प्रेसच्या (14624) दोन डब्यांना आग लागली. बुधवारी दुपारी घडलेल्या या घटनेमागील कारण अद्याप समजू शकलेले नाही. सूत्रांकडून मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, दोन प्रवासी या आगीत होरपळले आहेत. रेल्वेच्या डब्यांना आग लागल्याने आरडाओरडा सुरू झाल्याने प्रवाशांची तारांबळ उडाली. त्यानंतर याबाबत प्रशासनालाही कळविण्यात आले. पहिल्या टप्प्यात रेल्वे कर्मचाऱ्यांनी ग्रामस्थांच्या मदतीने आगीवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न केला. अग्निशमन दलाचे जवानही घटनास्थळी पोहोचले होते. पोलीस कर्मचारी आणि रेल्वे सुरक्षा दल (आरपीएफ) देखील तत्काळ घटनास्थळी पोहोचले. आग विझवण्यासाठी सर्वजण प्रयत्नशील होते. अथक प्रयत्नाअंती आगीवर नियंत्रण मिळविण्यात आले. सुदैवाने या दुर्घटनेत कोणीतीही जीवितहानी झाली नाही. रेल्वेच्या डब्यांमध्ये आग लागल्याची माहिती मिळताच सदर डोन डबे मुख्य रेल्वेपासून वेगळे करण्यात आल्याने आग इतरत्र पसरली नाही.









