वृत्तसंस्था / नवी दिल्ली
केंद्र सरकारपाठोपाठ रेल्वेनेही आपल्या कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात चार टक्के वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे आता हा भत्ता मूळ वेतनाच्या 46 टक्के करण्यात आला आहे. या निर्णयापूर्वी तो 42 टक्के होता. वाढीव भत्ता 1 जुलै 2023 पासून देण्यात येणार आहे. 23 ऑक्टोबरलाच रेल्वे मंडळाने हा निर्णय घेतला होता. तो बुधवारी प्रसिद्ध करण्यात आला आहे. या निर्णयाचा लाखो रेल्वे कर्मचाऱ्यांना आणि निवृत्तीवेतन धारकांना लाभ होणार आहे. रेल्वे कर्मचारी संघटना महासंघाचे सचिव एम. राघवैय्या यांनी या निर्णयावर समाधान व्यक्त केले आहे. मात्र, तो जानेवारी 2020 पासून द्यावा, ही मागणी आम्ही सोडणार नाही. रेल्वे मंडळाने या मागणीचा विचार करावा, असे प्रतिपादन त्यांनी केले.









