वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
भारतीय निवडणूक आयोग गुरुवार, 26 ऑक्टोबर रोजी अभिनेता राजकुमार राव याची राष्ट्रीय आयकॉन म्हणून नियुक्ती करणार आहे. ‘न्यूटन’ या हिंदी चित्रपटात छत्तीसगडमधील नक्षलग्रस्त भागात निवडणुका आयोजित करणाऱ्या अधिकाऱ्याच्या भूमिकेतील अभिनेता राजकुमार राव याला निवडणूक आयोगाद्वारे राष्ट्रीय आयकॉन म्हणून समाविष्ट केले जात आहे. यापूर्वी निवडणूक आयोगाने अभिनेता पंकज त्रिपाठी, आमिर खान आणि सचिन तेंडुलकर, एम. एस. धोनी आणि एम. सी. मेरी कोम या खेळाडूंना राष्ट्रीय आयकॉन म्हणून मान्यता दिली होती.
मतदारांना निवडणुकीत सहभागी होण्यासाठी प्रवृत्त करण्यासाठी निवडणूक आयोग प्रमुख भारतीयांना ‘राष्ट्रीय आयकॉन’ म्हणून नियुक्त करतो. त्यानुसार मुख्य निवडणूक आयुक्त राजीवकुमार गुऊवारी औपचारिकपणे अभिनेता राजकुमार राव याची निवडणूक आयोगाचे राष्ट्रीय आयकॉन म्हणून नियुक्ती करतील. छत्तीसगडच्या नक्षलग्रस्त भागात मुक्त आणि नि:ष्पक्षपणे निवडणुका घेण्याचा निर्धार असलेल्या, एका सुरक्षा अधिकाऱ्याच्या संशयावर आणि उदासीनतेवर मात करणाऱ्या तत्त्वनिष्ठ सरकारी लिपिकाच्या भूमिकेत राव यांचे चित्रण लोकांकडून मोठ्या प्रमाणात कौतुक झाले होते. या चित्रपटाला हिंदीतील सर्वोत्कृष्ट फीचर चित्रपटाचा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला आणि ऑस्कर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या 90 व्या अकादमी पुरस्कारांमध्ये सर्वोत्कृष्ट परदेशी भाषा चित्रपट श्रेणीसाठी भारताकडून नामांकनही करण्यात आले.









