वृत्तसंस्था / वृत्तसंस्था
केंद्र सरकार आणि रिझर्व्ह बँक 1 हजार रुपयांच्या नोटा पुन्हा चलनात आणणार आहे, असे वृत्त सध्या पसरलेले आहे. केंद्र सरकारने 1,000 आणि 500 रुपयांच्या नोटा चलनातून काढून टाकण्याचा निर्णय 8 नोव्हेंबर 2016 या दिवशी घेतला होता. त्यांच्या स्थानी 500 आणि 2 हजार रुपयांच्या नव्या नोटा चलनात आणल्या होत्या. त्यानंतर आता 2 हजार रुपयांच्या नोटांचा उपयोगही 30 सप्टेंबर 2023 पासून थांबविण्यात आला होता. त्यामुळे आता 500 रुपयांची नवी नोट हेच सर्वात मोठे चलन राहिले आहे. आता 1 हजारच्या नव्या नोटा पुन्हा चलनात आणण्यात येणार, अशी चर्चा आर्थिक वर्तुळात केली जात आहे.
मात्र, आता रिझर्व्ह बँकेनेच या चर्चेवर एका संदेशाद्वारे पडदा टाकला आहे. 1 हजार रुपयांच्या नव्या नोटा पुन्हा आणण्याचा रिझर्व्ह बँकेचा कोणताही विचार नाही. तसेच हा मुद्दा आमच्या चर्चेतही कधी आलेला नाही. त्यामुळे सर्वसामान्य लोकांनी यासंबंधी पसरविण्यात येत असलेल्या वृत्तांवर किंवा अफवांवर मुळीच विश्वास ठेवू नये, असे बँकेने आपल्या संदेशात स्पष्ट केले आहे.









