साडेतीन मुहूर्तापैकी एक आणि नव्या मोहिमा, नवे विचार आणि नव्या जाणिवांचे सोनं लुटायचा दिवस म्हणून दसरा सणाकडे पाहिले जाते. नव्या मोहिमांचा प्रारंभ म्हणून या उत्सवाकडे बघितले जाते. महाराष्ट्रात अलीकडे दसरा उत्सवाच्या निमित्ताने राजकीय शक्ती प्रदर्शन करण्याची आणि एकमेकांवर चिखलफेक करण्याची परंपरा रुढ झाली आहे. दसरा उत्सव की शिमगा उत्सव अशी त्यावर टिका होते आहे. यंदा मराठा आरक्षण आणि जरांगे-पाटील यांचे जोरदारपणे पुढे आलेले नेतृत्व यामुळे कोण काय बोलते, भूमिका घेते याकडे सर्वांचे लक्ष होते. मराठा समाजात अनेक कुटुंबे आर्थिक मागास आहेत. पण हा समाज महाराष्ट्रात संख्येने तगडा आहे. सहकार, राजकारण, सत्ताकारण, अर्थकारण यामध्ये या समाजाचा मोठा सहभाग आहे आणि हा समाज राजकीय साक्षर आहे, संघटीत आहे. या समाजाला कुणबी म्हणून आरक्षण हवे आहे. आता ही मागणी ऐरणीवर आली आहे. शरद पवार सत्तेवर असतात तेव्हा हा विषय मागे पडतो आणि सत्तेतून पायउतार होतात तेव्हा हा विषय तापतो अशी टिका होत असली तरी कुणाही राजकीय पक्षाला धडकी भरावी अशी विराट,अतिविराट सभा जरांगे यांनी घेऊन दाखवली आहे. मागे देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असतानाही अनेक जिह्यात मराठा समाजाच्यावतीने प्रचंड मोर्चे काढले गेले होते. संख्याबळ व मतपेटी हे राजकीय सत्तेसाठी महत्त्वपूर्ण असल्याने राज्यात कुणाचाही मराठा आरक्षणाला विरोध नाही. पण कायम टिकणारे आरक्षण, कायदा, नियम, घटना यांना अनुसरुन द्यायचे कसे हा प्रश्न आहे. पुण्यात शरद पवारांची गाडी अडवणाऱ्यांपासून छगन भुजबळ यांना टिकेचे लक्ष करण्यापर्यंत विविध गोष्टी यातून पुढे आल्या आहेत. भाजपाने एकेकाळी माधव योजना काढली आणि माळी, धनगर, वंजारी यांचे संघटन साधून काँग्रेस सत्तेला आव्हान निर्माण पेले होते पण आज ओबीसीचे हे माधव संघटन आणि मराठा समाज यांच्यात आपापसात व परस्परात संघर्ष होताना दिसत आहे. त्यामुळे भाजपासह अनेकांची पंचायत झाली आहे. उद्धव ठाकरे यांचा पक्ष फोडला, चिन्ह पळवले, राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पाडली वगैरे अनेक उद्योग घडवले गेले असले तरी भाजपला महाराष्ट्र आणि राज्यातील लोकसभा जागांसाठीचे 45 प्लस हे उद्दिष्ट गाठण्याची खात्री वाटत नाही. भाजपाची जी अवस्था तीच अवस्था शरद पवारांची आहे. अनेक राजकीय पंडित म्हणत होते शरद पवारांनी उद्धव ठाकरेंचा करेक्ट कार्यक्रम केला पण उद्धव ठाकरे यांची अलीकडे जी पावले पडत आहेत ती पाहता उद्धव ठाकरे शरद पवारांचा करेक्ट कार्यक्रम करतील असे दिसते आहे. ठाकरेंनी बहुजन विकास आघाडी, समाजवादी पक्ष आणि मराठा संघ यांच्याशी शिवसेना म्हणून मैत्री केली आहे. दसरा मेळाव्यात जरांगे-पाटील यांचे जाहीर अभिनंदन करण्यास आणि आरक्षणास पाठिंबा देण्यास ते विसरले नाहीत. मराठा समाजातील मात्तब्बर नेते आणि भाजपामधील दुर्लक्षित निष्ठावंत यांना ते चुचकारताना दिसत आहेत. सोशल इंजिनिअरिंगचा नवा प्रयोग करताना माझे हिंदुत्व शेंडी-जानव्याचे नाही असे ते सांगतात. या सगळ्याचा एकच अर्थ आहे. ठाकरे यांना शरद पवारांची व्होट बँक फोडायची आहे आणि ज्यांनी शिवसेनेचे आमदार पळवले त्यांचे कार्यकर्ते आपलेसे करायचे आहेत. दसरा मेळाव्यात तेच ते आरोप आणि तीच ती चिखलफेक ठाकरे आणि शिंदे यांनी केली पण दोघांनीही गर्दीचे राजकारण साधले. भाजप आणि संघ यांचे तीन कार्यक्रम दसऱ्याच्या निमित्ताने झाले. नागपुरात सरसंघचालक मोहन भागवत यांचे स्वयंसेवकांना मार्गदर्शन आणि सारा हिंदू एक साठीचे आवाहन आणि याच कार्यक्रमात पद्मश्री शंकर महादेवन यांनी गायलेले ‘मै रहू ना रहू, भारत रहना चाहिये’ हे पद्य, नितीन गडकरी, देवेंद्र फडणवीस यांची पूर्ण गणवेशातली उपस्थिती, स्वयंसेवकांच्या शक्तीचे, शिस्तीचे दर्शन यातून दिसले असले तरी सरसंघचालकांनी जनतेच्या अनेक विषयाकडे राजकीय हालचालीकडे कानाडोळा केला असे दिसून आले. मराठा समाज आणि ओबीसी व अन्य समाज, आर्थिक दुर्बल यांच्या हाताला काम नसलेले अनेक तरुण एकीकडे आणि केवळ खुर्चीचे राजकारण करणारे नेते दुसरीकडे यामुळे महाराष्ट्र आणि देश ही मंडळी कोठे नेऊन ठेवणार हा प्रश्नच आहे. उद्याचे जग आहे. ते तांत्रिकदृष्ट्या प्रगत आणि रोबोमार्फत चालवले जाईल असे सांगितले जाते आहे. सुमारे 80 टक्के लोकांना नोकऱ्या नसतील स्वतंत्र प्रतिभा, नवे तंत्र व अद्ययावत ज्ञान नसणारे व जे टीमवर्क करु शकत नाहीत असे युवा, नोकरदार मुख्य प्रवाहातून बाहेर टाकले जातील असे या क्षेत्रातील विचारवंत सांगतात. विनावाहक गाड्या, रेल्वे, विमाने सुरु होतील. शेती, बँकिंग, शिक्षण, उद्योग, व्यापार, करमणूक, वृत्तपत्रे यामध्ये अमूलाग्र बदल होतील. रोबोमार्फत युद्धे होतील अनेक गोष्टी ऑनलाईन व रोबो मार्फत केल्या जातील. बांधकाम व शेतीत रोबो व संगणक वापर सुरु झाला की बेरोजगारांची संख्या वाढेल. अनेक बदल अनेकांना स्वीकारणे कठीण जातील पण त्याच जोडीला जे युवक अपडेट राहतील, बदलाचे नेतृत्व करतील त्यांच्यासाठी संधीची नवी कवाडे उघडतील असे म्हटले जाते. उद्याच्या या जगासाठी महाराष्ट्र काय करतो आहे, काय करणार आहे याचे उत्तर मिळत नाही. खोकी, डोकी, जाती, पोटजाती यातून बाहेर पडणारे सीमोल्लंघन झाले असते तर बरे झाले असते. पण पंकजा मुढेंचा वेगळा सूर, गोपीचंद पडळकरांचा वेगळा विचार, अजित पवारांचा सत्तेसाठीचा दांडिया आणि शरद पवारांची वरुन एक आतून एक भूमिका, भाजपाचे काय सुरु आहे हेच कळत नाही आणि काही होताना दिसत नाही. मुख्यमंत्री शिंदे यांच्या भाषणात कोणताही नवा मुद्दा नव्हता. लोकसभेला 45 प्लस जागा देऊ आणि मी मराठाच आहे. मराठयांचे प्रश्न मला माहित आहेत. टिकणारे आरक्षण देणार याच विधानाचा पुनरुच्चार करत ते उद्धव ठाकरेंना टिकेचे लक्ष करत राहिल. ठाकरेंनी वेगळे काही सांगितले नाही. पंकजा मुढे, गोपीचंद पडळकर याचेही वेगळे काही नाही. केवळ चिखलफेक, उणीदुणी आणि टिका-टिपण्णी ओघानेच हे दसरा मेळावे की शिमगा मेळावा अशी विचारणा झाली. महाराष्ट्राच्या नशिबी काय आहे ते लवकरच समजेल पण उद्याच्या जगाच्या सावध हाका लक्षात घेऊन पावले टाकणे यातच शहाणपणा आहे.









