चित्र म्हणजे नेमकं काय? असा विचार करायला लागल्यावर लक्षात आलं की बिंदू, रेषा आणि त्याच्यामध्ये रंगवलेले वेगवेगळे रंग. खरं तर चित्र हे सपाट भागांवर काढायला लागते. त्याला लांबी आणि रुंदी एवढी दोनच मापं. त्याच्या पलीकडे त्याची व्याप्ती नाही. तरीपण या चित्राला स्पर्श असतो, पारदर्शकता असते, खरबरीतपणा असतो, मऊपणा असतो आणि ठळकपणादेखील असतो. हे सगळं जाणवण्याचं कारण म्हणजे त्या कलाकाराने त्याच्या मनातील कल्पना भाव आणि स्पंदनं, चित्रांद्वारे आपल्यापर्यंत पोहोचवलेले असतात. या चित्रांना उंची असते तशी खोलीही असते. चित्राचा बाह्य आकार चित्रातच सामावलेला असतो. खरंतर रेषा म्हणजे या चित्रांना घातलेले छंदमय अलंकारच. खरं तर छोट्या छोट्या बिंदूंनी या चित्राचे अस्तित्व साकार होत असतं. पदार्थाची जाडी उंची दाखवताना छाया प्रकाशाची जादू या ठिकाणी उपयोगाला येते. कारण चित्रांमध्ये कलात्मकतेबरोबरच प्रकाश शास्त्र म्हणजे ज्याला ‘ऑप्टिकल सायन्स’ असं आपण म्हणतो ते जास्त महत्त्वाचं असतं. आपल्याला बऱ्याचदा असं वाटतं की चित्र काढणारा समोरची प्रतिकृती काढत असतो पण चित्र पाहिल्यावर तुमच्या लक्षात येतं की तो जे चित्र काढत असतो त्या प्रतिकृतीच्या पलीकडे तो बघत असतो. जसं देवाचं दर्शन डोळे मिटून घ्यायचे असते तसाच हा प्रकार. त्याचा हेतू, त्याचा दृष्टिकोन आणि त्याला दिसलेलं चित्राच्या पलीकडचं. चीन आणि जपानमध्ये अशी स्मरणचित्रे जास्त बघायला मिळतात. तुमच्या बुद्धीवरती उमटलेल्या चित्रांना जो जो आकार दिला जातो त्याचं प्रतिबिंब त्या चित्रात दिसतं. भारतामध्ये आपली संस्कृती, आपला इतिहास या चित्रांमध्ये जपून ठेवलेला दिसतो. भारताचं खरं म्हणजे रवींद्रनाथ टागोर म्हणतात तसं सगळं निराळंच, असामान्य आहे. जगात वैभवाचं प्रदर्शन पाहायला मिळतं पण दिगंबर अहंकार शून्य भिक्षाचाऱ्यांचे मोठेपणाचं दर्शन फक्त भारतातच पहायला मिळते. इतर देशात धर्मश्रद्धा, पद्धती या सगळ्या बाबतीत ग्रंथावर अवलंबून असतात. पण आम्ही मात्र आमच्या चित्रातून या सगळ्या कल्पना मुक्तपणे मिळवत असतो. भारतात आचार विचार ग्रंथांमधून सांगितलेले आहेतच पण श्रद्धा, विश्वास याबाबतीत प्रत्येकाला मोकळीक दिलेली आहे. प्रचंड मोठं स्वातंत्र्य त्यांना दिसतं. ज्याला जो दगड आवडेल त्याचा तो देव बनतो. ज्याला जे झाड आवडेल त्याचा तो देव बनतो आणि या सगळ्या शिवाय आपण खरं म्हणजे अपूर्णच असतो. कारण अमूर्त कल्पना शोधत शोधत या चित्रांची पूर्तता होत असते. सर्वत्र ईश्वराचे स्वरूप आहे हे समजल्यावर तो चैतन्य स्वरूप ईश्वर कलेच्या माध्यमातून चित्रातून आपल्यासमोर प्रकटतो. गीतेच्या दहाव्या अध्यायात ‘सर्वत्र मीच आहे…’ असा बुद्धियोग सांगितलेला दिसतो पण असा भगवंत दिसणं, जाणवणं आणि शाश्वत सौंदर्याची ओळख होणं, हे भारतीय संस्कृतीचं, संस्कारांचं आणि कलेचं एक मोठं आनंदमय स्वरूप आहे. उपनिषदांमध्ये तर या चित्रकलेबद्दल खूप सुंदर सांगितले आहे. ‘या नभो मंडळात आनंद वावरत नसता तर आम्ही कोणी जगूच शकलो नसतो…’ इतकं या कलेचं महात्म्य प्राचीन काळापासून आमच्यापर्यंत येतं. आपणसुद्धा नुसत्या इमारती, रस्ते बांधून काम करत राहिलो असतो, तर आपल्याला वेड लागायची वेळ आली असती, पण या बिल्डिंगच्या भोवती इमारतींच्या भोवती असलेली झाडं, गवत, पक्षी, फुलं या सगळ्यामुळे या नीतांत सुंदर गोष्टीसुद्धा जिवंत होतात आणि तेव्हाच आपण त्याच्याशी एकरूप होऊ शकतो. कोणत्याही कलाकृतीतून आपल्याला एकरूप होता आलं तर ती कलाकृती श्रेष्ठ ठरते. ते चित्र आपल्या मनावर कोरलं जातं. अशा प्रकारचा रस आस्वाद प्रत्येक कलाकृतीतून आपल्याला घेता आला पाहिजे, ‘.. न ही रसाहूते काश्चिदर्थो प्रवर्तते….’ अशा रसामुळेच अर्थनिष्पत्ती होते आणि त्याचे आनंद प्रवाह तयार होतात. अशा प्रकारच्या रसांचा आस्वाद घेण्यासाठी प्रत्येक कलाकृतीकडे सहानुभूतीने बघायला हवं. हे सौंदर्य जाणवलं की खऱ्या अर्थाने रसग्रहण सुरू होतं. माणसाच्या वृत्ती उल्हासित होतात.
पूर्वार्ध








