अध्याय एकोणतिसावा
भगवंत म्हणाले, उद्धवा, ब्रह्मज्ञान ज्याला प्राप्त होईल तो ब्रह्मस्वरूप होईल. भगवंतांनी सांगितलेला ब्रह्मज्ञानाचा महिमा ऐकत असतानाच उद्धव ब्रह्मस्वरूप झाला. तो देहरुपात समोर दिसत असला तरी विश्वरूप झाला. आता तो कोणत्याही कारणाशिवायच स्वानंदात निमग्न झाल्याने काहीच बोलेनासा झाला. अशातच देवांनी उद्धवाला काही प्रश्न विचारला पण त्या प्रश्नाचे उत्तर द्यायचे भानसुद्धा उद्धवाला राहिले नाही. हे भान न राहण्याचे कारण म्हणजे तो आणि भगवंत हे एकरूपच झाले होते. हा आता आत्मस्वरूप झाला आहे हे भगवंतांनी ओळखले. दिसायला भगवंत आणि उद्धव ह्या दोन व्यक्ती जरी असल्या तरी त्यांची हृदये एकमेकात इतकी मिसळून गेली होती की, ती एकमेकांपासून वेगळी काढणे केवळ अशक्य होते. आपण सांगितलेल्या ब्रह्मज्ञानाची प्रचीती घेत असलेला आपला उद्धव आता आत्मस्वरूपी लीन झाला, हे त्यांच्या लक्षात आले. ज्याप्रमाणे शिष्याने आपल्या शिकवणुकीचे सार्थक केले हे जाणून एखादा सद्गुरु सुखाने तृप्त होतो त्याप्रमाणे उद्धवाने आत्मस्वरूप प्राप्त करून घेतले हे जाणून भगवंतांना सुखाचा मेरू पर्वत प्राप्त झाल्यासारखे झाले. आपल्या शिष्याला ब्रह्मज्ञानाची प्रचीती आलेली पाहून सद्गुरू अत्यंत समाधानी होतात आणि असा शिष्य आपण घडवू शकलो हे पाहून स्वत:ला धन्य समजतात. तशीच अवस्था भगवंतांची झाली. मुलाला जेव्हा सौख्यठेवा सापडतो तेव्हा वडीलांना अतिशय आनंद होतो तसा आनंद भगवंताना मिळाला आणि त्यामुळे ते संतुष्ट झाले. तसं बघायला गेलं तर भगवंत हे कायमच सुखस्वरूप होते परंतु उद्धवाला झालेल्या ब्रह्मप्राप्तीने त्यांना एक वेगळाच संतोष मिळाला. ह्या संतोषाची तुलना केवळ शिष्याला परिपूर्णता आल्यावर सद्गुरुना होणाऱ्या आनंदाशीच करता येईल. अशावेळी सद्गुरुना होणाऱ्या आनंदाची कल्पना करणे अशक्य आहे. शिष्याला ब्रह्मज्ञान झालेले असले तरी आपल्याला काय मिळाले आहे ह्याची लगेच कल्पना येत नाही पण सद्गुरू हे पूर्णपणे जाणून असतात म्हणून त्यांना होणारा आनंद अवर्णनीय असतो. ज्याप्रमाणे ताह्या बाळाला आईने घातलेल्या दागिन्यांमुळे आपण किती सुंदर दिसत आहोत ह्याची कल्पना नसते. त्याप्रमाणेच ब्रह्मज्ञान प्राप्त झालेल्या शिष्याला आपल्याला कोणते घबाड प्राप्त झाले आहे ह्याची कल्पना नसते परंतु त्या बाळाच्या आईला त्याच्या सौंदर्याची पुरेपूर जाणीव होत असल्याने ती त्याला पाहून अत्यंत आनंदात असते. त्या आईच्या आनंदाप्रमाणेच ब्रह्मज्ञान प्राप्त झालेल्या शिष्याकडे पाहून सद्गुरुना होणारा आनंद कल्पनेच्या पलीकडला असतो. भगवंतांना होणारा आनंद असाच अवर्णनीय होता. माझ्या उद्धवाला आता ब्रह्मज्ञान झाल्याने त्याचा सर्व संदेह नष्ट झाला ह्या कल्पनेने ते सुखावले.
उद्धवाची ब्रह्मनिष्ठता म्हणजे ब्रह्मप्राप्तीविषयी असलेली निष्ठा भगवंतांनी जाणली होती. त्याने इतरांनाही असाच उपदेश करावा ह्या उद्देशाने ब्रह्मज्ञान दिले होते. अर्थातच सर्वच शिष्य ब्रह्मज्ञान मिळवण्याचे अधिकारी नसतात हे लक्षात घेऊन, उद्धवाने शिष्याची योग्यता पाहून त्याला ब्रह्मज्ञानाचे दान करावे अशी त्यांची इच्छा होती. योग्य शिष्यांची पारख कशी करावी ह्याबद्दल भगवंत उद्धवाला सविस्तर माहिती देत आहेत. ते म्हणाले, तुला तर ब्रह्मज्ञान प्राप्त झाले पण ते कुणाला देण्याआधी तो ते घेण्यासाठी पात्र आहे की नाही ह्याची खात्री करून घे. त्यासाठी पात्र शिष्य कसे ओळखावेत हे सांगतो. त्याआधी अपात्र शिष्यांच्या ठायी कोणते दुर्गुण असतात ते सांगतो. नास्तिक, दंभयुक्त, अभक्त, दुर्वर्तन करणाऱ्या शिष्यांना हे ज्ञान देऊ नये. ज्यांना धन आणि सन्मान मिळावा अशी अतिशय हाव असते ते दांभिक असतात. ते केवळ माझे भजन करत असल्याचा देखावा करतात.
क्रमश:








