नुकत्याच दिवंगत झालेल्या अभिनेता रवींद्र महाजनी यांच्या ‘आराम हराम आहे’ या सिनेमातलं दृश्य आहे. आईवडील हयात नसलेला, एका अतिश्रीमंत घरातला एकुलता एक मुलगा, जवळपास वाया गेलेला म्हणावा असा. आपल्या शाळेला एक लाख रुपयांची देणगी द्यायला जातो. त्याचे गुरुजी त्याला चार खडे बोल सुनावतात. स्वकमाईच्या एक हजार रुपयांची देणगी द्यायला सांगतात. तो जेव्हा स्वत: कमावण्यासाठी बाहेर पडतो तेव्हा त्या गुरुजींच्या तोंडी असलेलं सुंदर गीत आहे,
आकाशी झेप घे रे पाखरा
सोडी सोन्याचा पिंजरा
अतिशय अर्थपूर्ण गीत आहे. आयत्या सुखाच्या पाकात गुलाबजामासारखं लोळणाऱ्या मुलाला मेहनत करण्याची उमेद देणारं हे सुंदर गीत गायलंय बाबूजींनी, आणि याचे शब्द आहेत जगदीश खेबुडकर यांचे. निराश झालेल्या माणसाला ती कोंडी फोडून बाहेर पडण्यासाठी अशी गाणी प्रेरणादायी असतात. अशी कित्येक गाणी येताजाता ऐकून आपल्या निराश, वैफल्यग्रस्त मानसिकतेतून बाहेर पडल्याची उदाहरणं कितीतरी आहेत. गाणं आपल्याला खूप काही सांगतं ते असं. कित्येकदा आपण आयुष्यात अशा अवस्थेला येऊन पोहोचतो की पुढे जायचे मार्ग तूर्तास खुंटलेले असतात. पाठी जाण्याचे दोर तुटलेले असतात. आहे तिथे उभं राहण्यासारखं नसतं. अशावेळी माणसाला ‘बुडत्याला काडीचा आधार’ या उक्तीप्रमाणे एखाद्या गाण्याच्या दोन ओळींचाही आधार वाटतो. आणि अशी कितीतरी गाणी कित्येक माणसांना उमेद देत आली आहेत. इतर कोणत्याही गोष्टींपेक्षा गाण्याचा प्रभाव नेहमीच जास्त ठरतो तो असा. ‘भिंतीला कान असतात’ अशा गमतीशीर नावाचा एक सुंदर चित्रपट आहे. त्यातलं एक फार सुरेख गीत
आहे.
बालपणी तुज छळते विपदा
थोरपणी तू मिळव संपदा
धनवंतांना जिंक दहादा
यशवंत हो जयवंत हो.
अडचणींनी घेरल्या गेलेल्या एका गुणी मुलाला मनापासून दिलेला हा आशीर्वाद आहे. त्याने निराश होऊ नये. हार मानू नये यासाठी पुढे त्याला मिळू शकणाऱ्या यशाची चित्रं दाखवणारं, त्याला उमेद देणारं, प्रेरणा देणारं हे गीत अर्थात गदिमा, बाबूजी द्वयीचं आहे. त्या दशकात आलेले कितीतरी चित्रपट असे होते की ज्यांची पटकथा आणि संवाद अतीव सुंदर होते. आणि अवीट गोडीच्या गाण्यांनी ते नटलेले
होते.
नोबेल पारितोषिक विजेते, जगत्प्रिय कविराज, गुरुदेव रवींद्रनाथ टागोर यांचं रवींद्र संगीत हा बंगालच्या जीवनाचा एक अविभाज्य भाग आहे. त्यांच्या अनेक सुप्रसिद्ध गीतांपैकी
जोदि तोदेर डाक शुने केऊ ना आछे
तुमि एकला चालो रे..
आयुष्यात चांगलं काही करायला गेलं की बहुधा सर्व परिजन ऐन अडचणीत साथ सोडतात. अशावेळी हताश न होता हीच परीक्षा आहे असं समजून पावलापुरत्या प्रकाशातही चालतंच रहायचं असतं. एकट्याने चालत राहायचं असतं. हेच सांगणारी ही कविता पुढे चित्रपटात गाणं होऊन गेली. एकापेक्षा अधिक गायकांनी आपापल्या शैलीने गाऊन ते कायम ताजं ठेवलंय. अगदी त्याच अर्थाशी समांतर असं एक गाणं मराठीतही घडलं. ते म्हणजे ‘हा माझा मार्ग एकला’ या चित्रपटाचं शीर्षक गीत.
हा माझा मार्ग एकला
शिणलो तरीही चालणे मला.

खरं तर आयुष्यात एकट्या राहिलेल्या माणसाचं ते गाणं. पण त्यातून प्रेरणा अशासाठी मिळते, की भले तो एकटा असेल पण त्याने अजून जगणं सोडलेलं नाही. आपल्याला न मिळालेली माया तो अनाथ मुलावर उधळतो. त्याला एकुटवाण्या जगण्याचं प्रयोजन गवसतं. कितीही दु:ख येवोत. पण आपण त्यातून जगणं शोधायचं असतं.
पंख कापले झेप थांबली तळमळसी पाखरा
तुझ्याभोवती फिरते नियती भिरभिरतो पिंजरा
सोनसाखळी तुला सांगते फिरू नको माघारी
घे भरारी..
घे भरारी चित्रपटातलं हे गाणं एका स्त्राrला प्रेरणा देणारं! सासरच्या जबाबदाऱ्यांमध्ये पद्धतशीरपणे गुरफटवून टाकलेल्या तिला, तू आकाशात उंच झेप घे म्हणणारं हे गाणं रवींद्र साठे यांनी गायलंय. तोंड मिटून न बसता होणाऱ्या अन्यायाविरुद्ध आवाज उठवणं आणि त्याला वाचा फोडणं गरजेचं असतं हे या गाण्यातून शिकायला मिळतं. भारतीय स्त्रियांसाठी दुर्दैवाने सासर हा एक मोठा आणि अभेद्य तुरुंगच ठरण्याची बऱ्याचदा शक्यता असते. तिच्यातल्या उत्तम क्षमतांना बऱ्याचदा तिथे कुजवून पद्धतशीरपणे मारलं जातं. नाना बंधनात तिला अडकवून तिचा आवाज बंद केला जातो. अशा दुर्दैवी जिवांसाठी हे गाणं म्हणजे एक दीपस्तंभ आहे.
ये रास्ता है कह रहा अब मुझसे
मिलने को है कोई नया अब तुझ से
यूँही चला चल राही यूँही चला चल राही
कितनी हसीन है ये दुनिया..
अत्यंत जोरकस म्हणावं असं मस्त गाणं. मकरंद देशपांडे आणि शाहरुख खान यांच्यावर चित्रित झालेलं. प्रवासात हमखास लावलं जाणारं झकास रिदमचं गाणं नुसतं ऐकूनच माणसाचा मूड फ्रेश होईल. दु:खी मूड कुठल्याकुठे पळून जाईल. हताश होऊन एकटं बसलेल्या कोणालाही हे ऐकवलं तर तो सगळं विसरून नाचायला लागेल. बडोदे संस्थानचे राजकवी असलेले भा. रा. तांबे यांचं
घनतमी शुक्र बघ राज्य करी
रे खिन्न मना बघ जरा तरी
हे गाणं म्हणजे सर्वोत्तम प्रेरणादायी गीत म्हणायला हरकत नाही.
ये बाहेरी अंडे फोडुनी
शुद्ध मोकळ्या वातावरणी
कां गुदमरशी आतच कुढुनी
रे! मार भरारी जरा वरी..
एकेक शब्द पारखून घ्यावा. स्वत:भोवती कोश विणून काय बसलायस? जरा बाहेर पड. श्वास घे. जितका आत आत बसून राहशील तितका कुढत राहशील. एकदा पंख फडफडवून तर पहा..पंखातलं बळ आजमावण्यासाठी उंच भरारी घेऊन तर बघ. असं म्हणणारं गाणं प्रेरणा देणारं असणारंच. पण हे शब्द अगदी राजस वाटतात. एका राजकवीच्या लेखणीतून उतरले म्हणून असतील कदाचित. खिन्न मनाला आनंदी करण्यासाठी किती कळकळीचा प्रयत्न केला आहे हा! पंडित हृदयनाथ मंगेशकर यांचं संगीत आणि दस्तुरखुद्द लतादीदींचे स्वर असा मणिकांचनयोग इथे साधला आहे.
काही माणसांना आयुष्य आयतं मिळतं म्हणून त्याची किंमत नसते, एखाद्याच्या आयुष्यात संकटं एवढी येतात की त्याचा स्वत:वरचा विश्वास नाहिसा होतो. तर एखाद्याची वृत्तीच धरसोड असते. या सर्वांना प्रेरित करण्याची गरज असते. आणि गाणं वर्षानुवर्षे हेच करत आलेलं आहे. यांना प्रेरित करत आलेलं आहे. कोश सोडण्यासाठी, दु:ख झाडण्यासाठी आणि भरारी घेण्यासाठी.
कष्टाविण फळ ना मिळते
तुज कळते परी ना वळते
हे समजावण्यासाठी.
-अॅड.अपर्णा परांजपे-प्रभु








