जिल्हा पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांचे स्पष्टीकरण
बेळगाव : सर्व नेते, कार्यकर्ते संघटित राहिल्यानेच राज्यात सत्ता आली आहे. त्यामुळे आपल्यामध्ये कोणतेच भिन्न मत नाही. मतभेद असल्यास पक्षाच्या वरिष्ठांना याची जाणीव करून देण्यात येईल, असे जिल्हा पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांनी सांगितले. सांबरा विमानतळ येथे पत्रकारांशी बोलताना त्यांनी ही माहिती दिली. राज्यामध्ये काँग्रेस पक्ष सत्तेत येण्यासाठी सर्व कार्यकर्ते, अनेक नेते या सर्वांमुळेच आपण सत्तेवर आलो आहोत. आपल्यामध्ये कोणतेच मतभेद नसल्याचे स्पष्टीकरण त्यांनी दिले. आपण प्रवासाला जाऊन आणखी एक सत्ता केंद्र निर्माण करण्याचा उद्देश ठेवला नव्हता. समान विचाराचे सर्व नेते एकत्रित येऊन प्रवासावर जाण्याचे नियोजन केले होते. आपण सर्वजण एकत्र असून यापुढेही एकत्र राहू, असे सांगून राजकीय मतभेदांवर सुरू असलेल्या चर्चेवर पडदा टाकला आहे.
आपण नियोजित केलेल्या प्रवासामुळे अनेक जणांनी वेगवेगळा अर्थ काढला आहे. मात्र, असे कोणतेच मतभेद नसल्याचे त्यांनी सांगितले. भाजपमध्ये सर्व काही ठीक नसल्याचेही त्यांनी सांगून त्यांच्यामध्येही गटबाजी सुरू असल्याचे सांगितले. जेडीएसमधील मतभेद चव्हाट्यावर आले असून त्यामध्येही गटबाजी निर्माण झाली आहे. आपल्या पक्षात सर्वजण वेगवेगळ्या ठिकाणी असले तरी निवडणुकी दरम्यान आपण एकत्र राहू, असे त्यांनी सांगितले. केपीसीसी कार्याध्यक्ष पदावरून आपल्यामध्ये कोणताच वाद नाही. आपणाला सोडून इतर कोणाला तरी हे पद द्यावे, असे आपणच सांगितले आहे. या पदावर नेमणुकीची जबाबदारी वरिष्ठांची असून यामध्ये आपण डोके घातले नाही. राज्यभरात दौरा करून पक्ष संघटित करण्याबरोबरच पक्षाला बळकटी देणाऱ्या व्यक्तीच्या नेमणुकीची सूचना केली असल्याचे त्यांनी सांगितले.









