दुर्गामाता दौडमध्ये महिला, लहान मुलांचा लक्षणीय सहभाग
वार्ताहर /कंग्राळी बुद्रुक
कंग्राळी खुर्द येथील संभाजी गल्लीतील नागरिकांनी व महिलांनी दुर्गामाता दौडीच्या स्वागतावेळी चक्क छत्रपती शिवाजी महाराजांच्या शिवकालीन प्रसंगाचे सजीव देखावे सादर केल्यामुळे गावामध्ये जणू शिवसृष्टी अवतरल्याचा भास होत होता. या सजीव देखाव्यामध्ये जिजाऊ, छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म, चुलीवर भाकरी करणे, उखळामध्ये धान्य सडणे अशा या रयतेच्या राजाचे सजीव देखावे सादर करण्यात आले होते. कंग्राळी खुर्द येथे घटस्थापनेपासून श्री शिवप्रतिष्ठान हिंदूस्थान शाखा व ग्रामस्थांच्यावतीने दुर्गामाता दौड मोठ्या अमाप उत्साहात सुरू आहे. दौडमध्ये तरुण, महिला व बालचमूंचा लक्षणीय सहभाग झाल्याचे दिसून येत आहे.
रांगोळ्या, फुलांची सजावट
या कार्यक्रमाचे औचित्य साधून संपूर्ण गल्लीत स्वच्छता करून रंगीबेरंगी आकर्षक रांगोळ्या, फुलांची सजावट, भगवे झेंडे, भगव्या पताका लावून व सारे वातावरण शिवमय केले होते. शिवाजी महाराजांच्या जीवनावरील सजीव देखावे इतके आकर्षक व हुबेहूब होते की, पाहणाऱ्या लोकांकडून कलाकारांना कौतुकाची थाप मिळत होती. शेवटी कलमेश्वर मंदिरात ध्येयमंत्राने दौडीची सांगता करण्यात आली.









