अथर्व हुबळीकरचा तिसरा क्रमांक
बेळगाव : हुबळी येथे एक्सलंट स्पोर्ट्स अकादमी आयोजित डॉ. खान्नूर्स बॅडमिंटन चषक निमंत्रितांच्या बॅडमिंटन स्पर्धेत बेळगाव क्लबच्या तनिष्का कोरीशेट्टीने एकेरीत विजेतेपद मिळवित दुहेरी मुकुट पटकाविला. तर मुलांच्या विभागात अथर्व हुबळीकरला तिसऱ्या क्रमांकावर समाधान मानावे लागले. हुबळी येथील एक्सलंट स्पोर्ट्सच्या सभागृहात आयोजित केलेल्या या स्पर्धेत 15 वर्षाखाली मुलींच्या एकेरीत उपांत्य फेरीत बेळगावच्या तनिष्का कोरीशेट्टीने रंजनाचा 21-13, 21-14 अशा गुण फरकाने पराभव करून अंतिम फेरीत प्रवेश केला. अंतिम सामन्यात तनिष्काने रिटा शेट्टीचा 21-8, 21-12 अशा गुण फरकाने पराभव करून एकेरीत विजेतेपद पटकाविले. महिलांच्या गटात पहिल्या उपांत्य फेरीच्या सामन्यात तनिष्काने साचीचा 21-17, 21-13 अशा गुण फरकाने तर अंतिम सामन्यात तनिष्काने ऐश्वर्याचा 21-16, 21-12 अशा गुण फरकाने पराभव करून विजेतेपद पटकाविले. मुलांच्या गटात एकेरीत अथर्वने उपांत्यपूर्व फेरीत धीरवर 30-22 अशा गुण फरकाने विजय मिळविला. मात्र उपांत्य फेरीत अथर्वचा मेघराजने 18-21, 15-21 अशा गुण फरकाने पराभव केला. तिसऱ्या क्रमांकासाठी खेळविण्यात आलेल्या सामन्यात अथर्वने हर्षवर्धचा 21-8, 21-15 अशा गुण फरकाने पराभव करून तिसरा क्रमांक पटकाविला. तनिष्का कोरीशेट्टी व अथर्व हुबळीकर यांना बॅडमिंटन एनआयएस प्रशिक्षक भूषण अणवेकर यांचे बहुमूल्य मार्गदर्शन तर बेळगाव बॅडमिंटन अकादमीचे सचिव अशोक पाटील यांचे प्रोत्साहन लाभत आहे.









