काल भारताने न्यूझीलंडविरुद्ध स्पर्धेतील पाचवा दिमाखदार विजय मिळवला. तोही कधी नाणेफेकीचा कौल जिंकत तर कधी हरत. हे पाच विजय धावांचा पाठलाग करताना मिळविले हे विशेष. भारताने 1983 आणि 2011 च्या विश्वचषक स्पर्धेत जरी अजिंक्यपद पटकावले तरी त्या स्पर्धेत बऱ्यापैकी संघर्ष करावा लागला होता. त्याचप्रमाणे उरलेल्या विश्वचषक स्पर्धेत जे सामने झाले त्या सामन्यात बराच घाम गाळावा लागला होता. परंतु सद्यस्थितीतील विश्वचषक स्पर्धा भारतासाठी हटके आहे. 3 बाद पाच ही स्थिती पाकिस्तानविरुद्ध सोडली तर भारताने पाचही सामन्यात चाबूक परफॉर्मन्स दिलाय. मी वर म्हटल्याप्रमाणे पाकिस्तानविरुद्धची दोन षटकं सोडली तर भारतीय संघ अडचणीत आहे, हे कधी जाणवलं नाही. पाचपैकी चार संघ हे निश्चितच तुल्यबळ होते. या चार संघाकडे प्रथितयश खेळाडूंचा भरणा होता. परंतु या चारी संघांचा अक्षरश: पालापाचोळा केला. ज्या पद्धतीने विराट कोहली बाद झाला ते पाहून थोडसं आश्चर्य वाटलं. त्याने पुन्हा एकदा षटकार मारून शतक झळकवण्याचा प्रयत्न केला. परत यावेळी त्याला नशिबाने साथ दिली नाही. धावांचा पाठलाग आणि विराटच्या धावा झाल्या नाहीत असं एक टक्काच घडलंय. ज्यावेळी असं घडू लागेल त्यावेळी क्रिकेटविश्वात ती एक बातमी असेल. विराट ज्या पद्धतीने चौथ्या, पाचव्या असो किंवा सातव्या- आठव्या फलंदाजाला विश्वासात घेऊन ज्या पद्धतीने भागीदारी रचत असतो, त्याला तोड नाही. त्याच्या फलंदाजीचं आणखीन एक वैशिष्ट्या असं की त्याला काही दोन-तीन षटकं जरी चांगली केली तरी त्याची एकाग्रता भंग होत नाही. एक काळ असा होता की सचिन तेंडुलकरने 24 वर्षे प्रेशर झेललं होतं. आज त्याची री कोहली ओढत आहे. धावांचा पाठलाग करताना धावांचा नियोजन कसं करावं, हे नवोदित खेळाडूंनी विराटकडून निश्चित शिकले पाहिजे. असो. विराटचे जेवढे कौतुक करावं तेवढं कमीच आहे.
यानंतर भारतासमोर चार सामने शिल्लक आहेत, त्यापैकी आफ्रिका, इंग्लंड हे दोन तगडे संघ आहेत. ज्या पद्धतीने या विश्वचषक स्पर्धेत इंग्लंडची वाताहत झाली आहे त्यावरून एक मात्र निश्चित की भारतासमोर खेळताना इंग्लंडला थोडं जपूनच खेळावं लागेल. दुसरीकडे याच उरलेल्या चार सामन्यात भारतीय संघ काही वेगळे प्रयोग करतो का हे बघणं मजेशीर ठरणार आहे. आता जवळपास भारतीय चमूमधील सर्व खेळाडूंना संधी मिळाली आहे. संघ व्यवस्थापन उपांत्य फेरीत कुठला संघ सामोर येणार आहे, त्यावरूनच एकंदरीत 11 खेळाडूंची यादी असेल. त्यातच हार्दिक पंड्याच्या अनुपस्थितीत मोहम्मद शमीने केलेली कमाल निश्चितच सुखावह आहे.
हा सामना संपल्यानंतर एका बुजुर्ग प्रेक्षकाचा मला फोन आला. विजय आता काय? भारतीय संघ उर्वरित चारही सामने जिंकत उपांत्य फेरीत गाठत अंतिम सामन्यात धडक मारतो की नाही ते बघा. अर्थात हे विधान धाडसाचे ठरू शकेल. परंतु माझं अंतर्मन मला सांगत होतं की यावेळी भारतीय संघ पाचव्या गियरमध्ये आहे. त्यांना रोखणं सध्यातरी कठीण वाटतंय. भारतीय संघासमोर नियतीने काय वाढवून ठेवले आहे हे बघणं क्रमप्राप्त आहे. पुन्हा एकदा मी एवढेच म्हणेन अभिनंदन आणि आगे बढो!
विजय बागायतकर, क्रिकेट समालोचक









