
वृत्तसंस्था/ मुंबई
विश्वचषकात आज मंगळवारी दक्षिण आफ्रिकेचा सामना बांगलादेशशी होणार आहे. दक्षिण आफ्रिकेने श्रीलंका आणि ऑस्ट्रेलियाला पराभूत केल्यानंतर त्यांना नेदरलँड्सकडून धक्का बसला होता. मात्र इंग्लंडचा 229 धावांनी पराभव करून त्यांनी गाडी पुन्हा ऊळावर आणली आहे. विश्वचषकात बांगलादेशला संघर्ष करावा लागलेला असला आणि तो संघ फारसा धोकादायक दिसला नसला, तरी दक्षिण आफ्रिकेला गाफील राहून चालणार नाही.
एकदिवसीय सामन्यांमधील बांगलादेशविऊद्धच्या दक्षिण आफ्रिकेच्या सहापैकी तीन पराभवांची नोंद गेल्या चार वर्षांत झाली आहे. 2019 च्या विश्वचषक स्पर्धेत बांगलादेशने त्यांना 21 धावांनी पराभूत केले होते. या दोन्ही संघांची विश्वचषकात आतापर्यंत चार वेळा गांठ पडली असून त्यात दक्षिण आफ्रिका दोनदा पराभूत झालेला आहे. बांगलादेशच्या संघात कर्णधार शकिब उल हसन आणि मेहदी हसन मिराझ यासारखे अष्टपैलू खेळाडू भरलेले असल्याने त्यांना हलके घेणे दक्षिण आफ्रिकेला परवडणारे नाही.
इंग्लंडविरुद्ध फक्त 4 धावा काढता आलेला दक्षिण आफ्रिकेचा सलामीवीर क्विंटन डी कॉक आज पुन्हा मोठी खेळी करून दाखविण्यास उत्सुक असेल. टेम्बा बावुमा आजारपणामुळे इंग्लंडविऊद्धच्या सामन्यात खेळू शकला नव्हता आणि तो परतला, तर रीझा हेंड्रिक्सला बाहेर बसावे लागेल. एडन मार्करम आणि रॅसी व्हॅन डर डुसेन ही मधल्या फळीतील एक मजबूत जोडी आहे आणि डेव्हिड मिलरला देखील मोठी धावसंख्या नोंदवायची आहे. इंग्लंडविऊद्धचा शतकवीर हेनरिक क्लासेनलाही बांगलादेशविऊद्धच्या सामन्यात चमकण्याची आशा असेल.
बांगलादेशसाठी कर्णधार शकिब हा चिंतेचा विषय राहिला आहे. त्याने रविवारी येथील सराव सत्रातही गोलंदाजी केली नाही. या अष्टपैलू खेळाडूला न्यूझीलंडविऊद्ध दुखापत झाली होती. तेव्हापासून तो संघात झळकलेला नाही आणि नजमुल हुसेन शांतोने संघाचे नेतृत्व केले आहे. तनझीद हसन व लिटन दास या वरच्या फळीतील फलंदाजांनी धावा केलेल्या आहेत. पण बांगलादेशच्या फलंदाजांना आतापर्यंत मोठी धावसंख्या उभारता आलेली नाही. फलंदाजीला अनुकूल वानखेडेची खेळपट्टी आज ती संधी त्यांना देऊ शकते. मात्र शकिबच्या उपलब्धतेबाबत अनिश्चिततेमुळे मधल्या फळीत शांतो, मिराझवरील भार वाढेल.
संघ : बांगलादेश-शकिब उल हसन (कर्णधार), लिटन दास, तनझीद हसन तमीम, नजमुल हुसेन शांतो, तौहीद ह्रदोय, मुशफिकर रहीम, महमुदुल्लाह रियाद, मेहदी हसन मिराझ, नसुम अहमद, महेदी हसन, तस्किन अहमद, मुस्तफिजुर रेहमान, हसन महमूद, शोरिफुल इस्लाम, तनझिम हसन साकिब.
दक्षिण आफ्रिका-टेम्बा बावुमा (कर्णधार), जेराल्ड कोएत्झी, क्विंटन डी कॉक, रीझा हेंड्रिक्स, मार्को जॅनसेन, हेनरिक क्लासेन, केशव महाराज, एडेन मार्करम, डेव्हिड मिलर, लुंगी एनगिडी, अँडिले फेहलुकवायो, कागिसो रबाडा, तबरेझ शम्सी, रॅसी व्हॅन डर डुसेन, लिझाद विल्यम्स.
सामन्याची वेळ : दुपारी 2 वा.









