वृत्तसंस्था/ ऑस्टिन, टेक्सास
रेड बुलच्या मॅक्स व्हर्स्टापेनने येथे झालेल्या अमेरिकन ग्रां प्रि फॉर्म्युला वन शर्यतीत संघर्षपूर्ण विजय मिळविला. त्याचे हे कारकिर्दीतील 50 वे जेतेपद आहे. मॅक्लारेनच्या लँडो नोरिसला दुसरे तर फेरारीच्या कार्लोस सेन्झला तिसरे स्थान मिळाले.
ग्रीडवर त्याला पोलऐवजी सहाव्या स्थानावरून सुरुवात करावी लागली होती. मात्र अखेरच्या टप्प्यात मर्सिडीजच्या लेविस हॅमिल्टनला मागे टाकत ही शर्यत जिंकली. हॅमिल्टनला दुसरे स्थान मिळाले होते तर फेरारीच्या चार्लस लेक्लर्कने सहावे स्थान मिळविले होते. पण या दोघांनी नियमांचे उल्लंघन केल्यामुळे त्यांना शर्यत संपल्यानंतर तीन तासांनी अपात्र ठरविण्यात आले. व्हर्स्टापेनने मोसमातील 15 वे जेतेपद पटकावत विक्रमाशी बरोबरी केली असून 50 जेतेपदे पटकावणारा तो पाचवा फॉर्म्युला वन ड्रायव्हर आहे. हॅमिल्टनने सर्वाधिक 103 शर्यती जिंकल्या आहेत. अॅलेन पोस्टने 51, सेबॅस्टियन व्हेटेलने 53 शर्यती जिंकल्या आहेत. या मोसमात अद्याप चार शर्यती बाकी असून या दोघांना मागे टाकून तिसरे स्थान मिळविण्याची व्हर्स्टापेनला संधी आहे. मायकेल शुमाकर 91 शर्यती जिंकून दुसऱ्या स्थानावर आहे.
मॅक्लारेनच्या लँडो नोरिसने तिसरे स्थान मिळविले होते. पण हॅमिल्टन अपात्र ठरल्याने त्याला दुसरे स्थान देण्यात आले. फेरारीच्या कार्लोस सेन्झला तिसरे स्थान मिळाले. विल्यम्सच्या लोगान सार्जंटला बारावरून दहावे स्थान मिळाल्याने त्याला या मोसमात पहिला गुण मिळाला.









