प्रणव सूरमा, अवनी लेखरा, प्रवीण कुमारचे नवे स्पर्धा विक्रम
वृत्तसंस्था/ हांगझाऊ, चीन
येथे सुरू झालेल्या पॅरा आशियाई क्रीडा स्पर्धेत पहिल्याच दिवशी भारतीय खेळाडूंनी सहा सुवर्णपदकांसह एकूण 17 पदकांची कमाई केली. तरीही पदकतक्त्यात चीन, इराण, उझ्बेकनंतर भारत चौथ्या स्थानावर आहे. पुरुषांच्या क्लब लाठीफेकमध्ये तीनही पदके पटकावली. प्रणव सूरमाने त्यातील सुवर्ण मिळविले. त्यानंतर स्टार नेमबाज अवनी लेखराने महिला विभागात नवा स्पर्धाविक्रम नोंदवत सुवर्ण पटकावले. या पदकांत 6 सुवर्ण, 6 रौप्य, 5 कांस्यपदकांचा समावेश आहे.

महिलांच्या आर 2 10 मी. एअर रायफल स्टँडिंग एसएच 1 विभागात 249.6 गुणांसह नवा स्पर्धाविक्रम नोंदवत सुवर्ण पटकावले. मोना अगरवालने सहावे स्थान मिळवेले. 2022 टोकियो पॅरालिम्पिकमध्ये अवनीने सुवर्ण मिळवित भारताची पहिली सुवर्णविजेती होण्याचा मान मिळविला होता. नंतर तिने 50 मी. रायफल थ्री पोझिशन्समध्येही कांस्य मिळविले होते. पुरुषांच्या नेमबाजीत रुद्रांश खंडेलवालने पी 4 मिश् 50 मी. पिस्तुल एसएच1 प्रकारात रौप्य मिळविले.
ट्रॅक अॅन्ड फील्डमध्ये भारतीय खेळाडूंनी वर्चस्व राखत 17 पैकी 11 पदके पटकावली. त्यात 5 सुवर्णपदकांचा समावेश आहे. पुरुषांच्या लाठीफेक एफ 51 प्रकारात 29 वर्षीय प्रणव सूरमाने 30.10 मी. लाठीफेक करीत नव्या स्पर्धाविक्रमासह सुवर्ण निश्चित केले तर धरमबिर (28.76 मी.) व अमित कुमार (26.93 मी.) अनुक्रमे रौप्य व कांस्यपदक मिळविले. या स्पर्धेत चार स्पर्धक होते. सौदा अरेबियाच्या राधी अली अलहार्थीनश 23.77 मी. फेक करीत चौथे स्थान मिळविले.

पुरुषांच्या उंच उडीमध्येही भारताने पहिले, दुसरे व तिसरे स्थान मिळविले. तीनच स्पर्धक असल्याने एपीसीच्या मायनस वन नियमानुसार शैलेश कुमारला सुवर्ण मिळाले. त्याने 1.82 मी. उंच उडी घेतली तर मरियप्पन थांगवेलूने 1.80 मी. उडी घेत रौप्य मिळविले. गोविंदभाई रामसिंगभाई पढियारने 1.78 मी. उंच उडी घेतली. पण एपीसी नियमानुसार त्याला कांस्य देण्यात आले नाही. सर्व तीन पदके देण्यासाठी किमान चार स्पर्धक असणे आवश्यक आहे.

पुरुषांच्या टी47 विभागातील उंच उडीमध्ये निषाद कुमारने भारताला दिवसातील तिसरे सुवर्ण मिळवून दिले. त्यानंतर 2.02 मी. उंच उडी घेतली तर त्याचाच देशवासी राम पालने 1.94 मी. उडी घेत कांस्यपदक मिळविले. याशिवाय मोनू घनगासने पुरुषांच्या एफ11 गोळाफेकमध्ये 12.33 मी. गोळाफेक करीत कांस्य मिळविले. महिलांच्या कॅनोई व्हीएल2 प्रकारात प्राची यादवने 1:03.147 मि. अवधी घेत रौप्य मिळविले.
अंकुर धामा व प्रवीण कुमार यांनी पुरुषांच्या 5000 मी. टी11 व उंच उडी टी64 या प्रकारात सुवर्णपदके मिळविली. प्रवीणने 2.02 मी. उंच उडी घेत स्पर्धाविक्रम नोंदवला. अंकुरने 16:37.29 मि. अवधी घेत पहिले स्थान पटकावले.
ज्युडोमध्ये कपिल कुमारने पुरुषांच्या 60 किलो जे1 प्रकारात रौप्य तर महिलांच्या 48 किलो जे2 विभागात कोकिलाने कांस्यपदक मिळविले. तायक्वांदोमध्ये अरुणाने महिलांच्या 47 किलो के44 गटात कांस्यपदक मिळविले.









