राज्य सरकारची घोषणा : स्टेमी योजनेंतर्गत सुविधा उपलब्ध करणार
प्रतिनिधी/ बेंगळूर
राज्य सरकारने अर्धांगवायू आणि हृदयविकाराचा झटका आलेल्या रुग्णांना मोफत जीवबचाव इंजेक्शन उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला आहे. ‘स्टेमी’ योजनेंतर्गत ही सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. यामुळे गरीब आणि मध्यमवर्गीय रुग्णांना अनुकूल होणार आहे. सरकारने यासंबंधीची माहिती वार्ता आणि जनसंपर्क खात्याच्या माध्यमातून दिली आहे.

अर्धांगवायूमुळे अवयव निकामी होण्याची आणि मृत्यूचीही शक्यता असते. तसेच हृदयविकाराच्या धक्क्यामुळे 90 मिनिटांच्या आत योग्य उपचार न मिळाल्यास संबंधित व्यक्तीचा मृत्यू होण्याची शक्यता असते. त्यामुळे सरकारने अर्धांगवायू झालेल्या रुग्णांसाठी 60 हजार रुपये किमतीचे ‘आरटी प्लस’ इंजेक्शन आणि हृदयविकारासाठी 40 हजार रुपये किमतीचे ‘टेनेक्ट प्लस’ इंजेक्शन मोफत उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचे आरोग्य आणि कुटुंब कल्याणमंत्री दिनेश गुंडूराव यांनी सांगितले.
इंजेक्शनची आवश्यकता असलेल्या सर्वांना ‘स्टेमी’ योजनेंतर्गत आरोग्य खात्याकडून मोफत उपलब्ध केले जाणार आहे. रुग्णांचे बीपीएल, एपीएल असे कोणतेही वर्गीकरण करण्यात आलेले नाही. अर्धांगवायू झालेल्यांचे एमआरआय किंवा सिटीस्कॅन करून रक्तवाहिन्यांमध्ये ब्लॉकेज आढळून आल्यास ‘आरटी प्लस’ इंजेक्शन देण्यात येते. तर हृदयविकाराचा धक्का बसलेल्यांची इसीजी चाचणी करून ‘टेनेक्ट प्लस’ इंजेक्शन दिले जाते.
सुरुवातीला प्रायोगिक तत्वावर योजना
कर्नाटक सरकारने या सर्वंकष आरोग्य योजनेची घोषणा केली आहे. त्यानुसार ज्यांना अर्धांगवायू किंवा हृदयविकाराचा झटका आला आहे, त्यांना द्यावयाची इंजेक्शने विनामूल्य पुरविली जाणार आहेत. प्रायोगिक तत्वावर या योजनेचा प्रारंभ लवकरच होणार असून त्यानंतर काही काळातच ही योजना राज्यभर लागू करण्यात येईल.
कर्नाटक सरकारने ही योजना आंध्रप्रदेश सरकारच्या धर्तीवर सादर केलेली आहे. आणिबाणीच्या प्रसंगी हृदयविकाराच्या रुग्णांना या इंजेक्शनची आवश्यकता भासते. त्यांना रुग्णालयात आणल्यानंतर त्वरित त्यांना हे इंजेक्शन द्यावे लागते. अर्धांगवायू किंवा स्ट्रोकच्या रुग्णांनाही त्वरित हे इंजेक्शन देण्याची आवश्यकता असते. हे इंजेक्शन झटका आल्यानंतर त्वरित दिल्यास रुग्णाचे प्राण वाचू शकतात. तसेच त्याची प्रकृती बरीही होऊ शकते, अशी माहिती देण्यात आली आहे.
हृदयविकारांचे वाढते प्रमाण
गेल्या काही वर्षांमध्ये तरुणांमध्ये हृदयविकार होण्याचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे राज्य सरकारने ही परिस्थिती गांभीर्याने घेण्याचा निर्णय घेतला असून या रोगावर उपयोगात आणल्या जाणाऱ्या औषधांचा आणि इंजेक्शन्सचा पुरेसा साठा रुग्णालयांमध्ये करण्याचा निर्णयही घेतला जाण्याची शक्यता आहे. ही इंजेक्शने कशी मिळवावीत याचे नियम आणि पद्धतीही राज्य सरकार लवकरच प्रसिद्ध करेल, अशी शक्यता आहे. या योजनेमुळे गरीब आणि आणिबाणीच्या परिस्थितील रुग्णांचा, तसेच त्यांच्या नातेवाईकांचा मोठा लाभ होणार आहे.









