पॅलेस्टाईनचा दावा, वेस्ट बँकमध्येही मोठी कारवाई
वृत्तसंस्था / प्रतिनिधी
इस्रायलने गाझा पट्टीवरील वायुहल्ले वाढविले असून सोमवारी हमास या इस्लामी दहशतवादी संघटनेच्या 348 हून अधिक तळांवर जोरदार बाँबवर्षाव केला आहे. या हल्ल्यांमध्ये हे तळ पूर्णत: उद्ध्वस्त झाले असून हमासचा शक्ती मोठ्या प्रमाणात कमी करण्यात यश मिळाल्याचे प्रतिपादन इस्रायलकडून करण्यात आले आहे. इस्रायलच्या हल्ल्यांमध्ये 78 पॅलेस्टाईनी नागरिकांचा मृत्यू झाल्याचा दावा करण्यात आला. गाझापट्टीत गेल्या 17 दिवसांमध्ये 4 हजार 500 हून अधिक ठार झाल्याचेही पॅलेस्टाईनी सरकारचे म्हणणे आहे. वेस्ट बँकमध्येही इस्रायलने जोरदार हल्ले करुन हमासच्या आठ कमांडर्सना यमसदनी धाडल्याची माहिती देण्यात आली. येत्या काळात आणखी जोरदार हल्ले होतील, असे इस्रायलने स्पष्ट केले.
प्राप्त परिस्थितीत स्वसंरक्षणाचा पूर्ण अधिकार इस्रायलला आहे, अशी स्पष्टोक्ती अमेरिकेने पुन्हा एकदा केली आहे. अमेरिकेचे संरक्षणमंत्री अँथोनी ब्लिंकन यांनी अमेरिका इस्रायलच्या पाठीशी नेहमी असेल असेही स्पष्ट केले. इस्रायलने हल्ले थांबविले नाहीत, तर युद्धाची व्याप्ती वाढणार आहे, अशी धमकी इराणने दिल्यानंतर अमेरिकेने पुन्हा एकवार इस्रालयची पाठराखण केलेली आहे.
वेस्ट बँकमध्ये 93 ठार
गाझा पट्टीप्रमाणेच वेस्ट बँकमध्येही इस्रायलने हमास दहशतवाद्यांवर हल्ले चढविले आहेत. या हल्ल्यांमध्ये 93 हमास दहशतवादी ठार झाले. हमासला पूर्णपणे नष्ट करण्याचा इस्रायलचा निर्धार असून कोणत्याही क्षणी गाझापट्टीत सैनिकांचा प्रवेश होईल, असा इशारा इस्रायलने पुन्हा दिला. गाझापट्टीवर हल्ले वाढविले गेल्याने आता इस्रायलचे हजारो सैनिक तेथे प्रवेश करतील अशी शक्यता आहे.
ओलिसांची संख्या 222
7 ऑक्टोबरला हमासच्या दहशतवाद्यांनी केलेल्या इस्रायलवर केलेल्या क्रूर हल्ल्यात 222 जणांचे अपहरण करण्यात आल्याचे इस्रायलकडून स्पष्ट करण्यात आले. इस्रायली सेनेचे प्रवक्ते डॅनियल हगारी यांनी ही संख्या स्पष्ट केली. आतातर्यंत साधारण 210 पर्यंत ओलीस असतील अशी शक्यता व्यक्त करण्यात आली होती. तथापि, नव्या माहितीनुसार ही संख्या 222 आहे.
अनेक देशांचा पाठिंबा
अमेरिका, कॅनडा, फ्रान्स, जर्मनी, इटली आणि ब्रिटन या सहा देशांची महत्वाची बैठक या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर सोमवारी पार पडली. या बैठकीत इस्रायलला पूर्ण पाठिंबा व्यक्त करण्यात आला. इस्रायलला आपल्या संरक्षणाचा पूर्ण अधिकार आहे. इस्रायलची हमास या दहशतवादी संघटनेविरोधातील कारवाई समर्थनीय आहे. मात्र, या संघटनेविरोधात कारवाई होत असताना सर्वसामान्य नागरीकांची हानी कमीत कमी व्हावी, अशी अपेक्षाही या बैठकीत व्यक्त करण्यात आली आहे.
हमासच्या हल्ल्यात सैनिक हुतात्मा
हमासने गाझा पट्टीच्या सीमारेषेवर केलेल्या हल्ल्यात एका इस्रायली सैनिकाला वीरमरण प्राप्त झाले आहे, अशी माहिती इस्रायलकडून देण्यात आली आहे. इस्रायलनेही केलेल्या प्रतिहल्ल्यात हल्लेखोर दहशतवाद्यांची मोठी हानी झाली. या संघर्षात हिजबुल्ला या दहशतवादी संघटनेने प्रवेश केला, तर लेबेनॉन आणि सिरीया या देशांची अतोनात हानी होईल, असा इशारा इस्रायलने दिला आहे.
हमासनंतर कोण, यावर विचार
इस्रायलने गाझापट्टीत घुसून हमासचा नि:पात करण्यात यश मिळवले तर नंतर गाझापट्टीचे अधिकार कोणाकडे दिले जाणार, यावर विचार करावा, अशी सूचना अमेरिकेचे परराष्ट्र व्यवहार मंत्री अँथोनी ब्लिंकन यांनी इस्रायलला केली आहे. ही सूचना करुन अमेरिकेने प्रथमच इस्रायलला गाझापट्टीवर भूमी कारवाई करण्यासाठी अनुमतीचे संकेत दिले आहेत, असे मत व्यक्त होत आहे. त्यामुळे इस्रायलचा उत्साह वाढला असून लवकरच ही कारवाई होण्याची शक्यता आहे.
इस्रायलच्या समर्थनार्थ निदर्शने
जगभरात हमासच्या समर्थनार्थ मुस्लिमांचे मोर्चे निघत असताना, आता इस्रायललाही जगातील लोकांचे उघड समर्थन मिळताना दिसून येत आहे. जर्मनीतील शहर बर्लिन आणि ब्रिटनची राजधानी लंडन येथे लक्षावधी इस्रायल समर्थन नागरिकांनी भव्य मोर्चे काढून सेमेटिझम विरोधी शक्तींचा पाडाव करा, अशा घोषणा इस्रायलच्या समर्थनार्थ दिल्या. अन्य शहरांमध्येही अशी निदर्शने झाली.
नाही तर पाषाणयुगात पाठवू
इस्रायलवरचे हल्ले रोखा आणि दहशतवादी संघटनांना नियंत्रणात ठेवा. अन्यथा तुम्हाला पाषाणयुगात पाठवू असा स्पष्ट इशारा इस्रायलने लेबेनॉन आणि हिजबुल्ला यांना दिला आहे. आमच्या संयमाची परीक्षा पाहू नका. अन्यथा तुमचा सर्वनाश होऊ शकतो, असाही स्पष्ट संदेश इस्रायलने आपल्या शत्रूंना दिला आहे.
सोमवारी युद्ध आघाडीवर…
ड अमेरिका, ब्रिटनसह सहा इस्रायलसमर्थक देशांची महत्वाची बैठक
ड इस्रायलने हमासविरोधात कारवाई करण्याचे अमेरिकेचे स्पष्ट संकेत
ड इस्रायलच्या हल्ल्यात हमास, हिजबुल्लाचे अनेक दहशतवादी ठार
ड जगातील अनेक शहरांमध्ये इस्रायलच्या समर्थनार्थ प्रचंड निदर्शने
ड इराणची पुन्हा युद्धाची धमकी, इस्रायलचेही इराणला चोख प्रत्युत्तर









