प्रत्युत्तरानंतर अन्य फरार : साथीदारांचे मृतदेहही नेले; शस्त्रास्त्रे-दारूगोळा जप्त
वृत्तसंस्था/ श्रीनगर
जम्मू-काश्मीरमधील बारामुल्ला येथील उरी सेक्टरमध्ये सुरक्षा दलांनी दोन दहशतवाद्यांचा खात्मा केला आहे. लष्कराने या कारवाईसंबंधी माहिती जारी केली असून दोन्ही दहशतवादी एका मोठ्या संघटनेचे हस्तक असल्याचे स्पष्ट केले. दहशतवाद्यांचा एक गट पाऊस आणि खराब दृश्यमानतेचा फायदा घेत नियंत्रण रेषा ओलांडण्याचा प्रयत्न करत होता. याचवेळी भारतीय सुरक्षा दलाने सावध पवित्रा घेत त्यांना रोखण्याचा प्रयत्न केला. यादरम्यान सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये झालेल्या संघर्षात दोघांना कंठस्नान घालण्यात आले.
सशस्त्र दहशतवाद्यांचा एक गट सीमा ओलांडण्याचा प्रयत्न करत असल्याची माहिती गुप्तचर विभागाकडून प्राप्त झाली होती. त्यानंतर भारतीय लष्करी पथकासह गुप्तचर संस्था आणि जम्मू-काश्मीर पोलीस यांच्या संयुक्त पथकाने व्यापक मोहीम हाती घेत घुसखोरी रोखण्यासाठी व्यूहरचना केली होती. सुरक्षा दलांना हाय अलर्टवर ठेवत घुसखोरीविरोधी ग्रिड मजबूत करण्यात आल्याचे संरक्षण प्रवक्त्याने सांगितले. दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास लष्कराच्या सतर्क तुकडीने दहशतवाद्यांच्या गटाला रोखले, त्यानंतर दहशतवाद्यांनी लष्करावर गोळीबार सुरू केला. रात्री उशिरापर्यंत दोन्ही बाजूंनी गोळीबार सुरू होता, त्यात दोन दहशतवादी मारले गेले. उर्वरित दहशतवादी आपल्या हद्दीत परतले. त्यांनी मृत दहशतवाद्यांचे मृतदेहही नेले, असे संरक्षण प्रवक्त्याने सांगितले.
घटनास्थळी सापडला शस्त्रास्त्रे, दारूगोळा
दोन दहशतवाद्यांचा खात्मा केल्यानंतर लष्कराने संध्याकाळपर्यंत परिसरात शोध मोहीम राबवली. झडतीदरम्यान घटनास्थळावरून अनेक शस्त्रास्त्रे सापडली. यामध्ये दोन एके सिरीज रायफल, 6 पिस्तूल, चार चिनी ग्रेनेड, ब्लँकेट आणि पाकिस्तानी आणि भारतीय चलन, पाकिस्तानी औषधे आणि खाद्यपदार्थ असलेल्या दोन रक्ताने माखलेल्या पिशव्यांचा समावेश होता.









