पाकिस्तानी वंशाचे पंतप्रधान हमजा यांच्याकडून बळ
वृत्तसंस्था/ ग्लासगो
ब्रिटनमधील ऋषी सुनक सरकारने कठोर धोरण स्वीकारल्याने आता भारतविरोधी खलिस्तानींनी स्कॉटलंडला स्वत:चा नवा अड्डा केले आहे. स्कॉटलंडमध्ये खलिस्तानी दहशतवाद्यांची जाहीरपणे गुणगान केले जात आहे. याचदरम्यान पाकिस्तानी वंशाचे स्कॉटलंडचे फर्स्ट मिनिस्टर हमजा युसूफ यासंबंधी सोयीस्कररित्या मौन बाळगून आहेत.
स्कॉटलंडमध्ये खलिस्तानच्या नावावर केल्या जाणाऱ्या फंडिंला हमजा प्रशासन रोखणे टाळत आहे. भारतात प्रतिबंधित दहशतवादी संघटना शिख फॉर जस्टिस (एसएफजे) स्कॉटलंडमध्ये निधी गोळा करत आहे.
एसएफजे पुढील वर्षी स्कॉटलंडमध्ये जनमत चाचणी आयोजित करवू पाहत आहे. एसएफजेने सुमारे 20 कोटी रुपयांचा निधी जमविला आहे. तर स्कॉटलंडमध्ये प्रतिबंधित संघटनांकडून क्राउड फंडिंग करण्यावर बंदी आहे. काही दिवसांपूर्वी खलिस्तानींनी भारतीय राजदूत दोराईस्वामी यांना गुरुद्वारामध्ये जाण्यापासून रोखले होते. तर खलिस्तानी आता सोशल मीडियावर यासंबंधीचा व्हिडिओ पोस्ट करत आहेत. या घटनेचा तपास केला असून याप्रकरणी गुन्हा नोंदविला जाणार नसल्याचे स्कॉटलंड पोलिसांचे सांगणे आहे.
भारतविरोधी वर्तन
स्कॉटलंडमधील प्रमुख भारतीय नेते नील लाल यांच्यानुसार हमजा यांची प्रतिमा नेहमीच संशयास्पद राहिली आहे. भारतीय समुदाय हमजा प्रशासनात स्वत:ला सुरक्षित समजत नाही. हमजा यांनी यापूर्वी हिंदू-मुस्लिमांमध्ये तणाव निर्माण करण्याचा प्रयत्न केला होता असे लाल यांचे सांगणे आहे. स्कॉटलंडमध्ये हमजा यांच्या लोकप्रियतेत मोठी घट होत आहे. नव्या सर्वेक्षणानुसार मार्च महिन्यात पद स्वीकारल्यापासून हमजा यांच्या लोकप्रियतेत 11 टक्क्यांची घसरण झाली आहे. 55 टक्के स्कॉटिश लोक हमजा यांच्या कार्यशैलीवर नाराज आहेत.
दहशतवादी जोहलला अटक
खलिस्तानी दहशतवादी जगवार सिंह जोहल विरोधात भारत सरकारने केलेली कारवाई योग्य असल्याचे ब्रिटनने म्हटले आहे. स्कॉटलंडचा रहिवासी जोहलला 2017 मध्ये पंजाबमधील हिंदू नेत्याच्या हत्येत सामील गुन्हेगारांना मदत केल्याप्रकरणी अटक करण्यात आली होती. जोहलच्या कुटुंबाने याप्रकरणी सुनक सरकारला भारत सरकारशी चर्चा करण्याचे आवाहन केले आहे, परंतु सुनक यांनी जोहल प्रकरणी भारत सरकारशी चर्चा करण्यास नकार दिला आहे.









