जागतिक सुरक्षेसोबत अनेक महत्त्वाच्या मुद्यांवर होणार विचारविनिमय :
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
जगाच्या अनेक भागांमध्ये फैलावलेल्या अशांततेदरम्यान भारत आणि अमेरिका यांच्यात 9-10 नोव्हेंबर रोजी नवी दिल्लीत 2 प्लस 2 बैठक आयोजित होणार आहे. अमेरिकेचे संरक्षण मंत्री लॉयड जे ऑस्टिन आणि विदेशमंत्री एंटनी ब्लिंकेन हे नवी दिल्लीत भारताचे विदेशमंत्री एस. जयशंकर तसेच संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांच्यावर चर्चा करणार आहेत. 2 प्लस 2 ही चर्चा भारत आणि अमेरिका यांच्यातील सामरिक संबंध वृद्धींगत होण्याच्या दृष्टीने मागील काही काळात अत्यंत उपयुक्त ठरली आहे.
या बैठकीदरम्यान इस्रायल-हमास युद्धामुळे पश्चिम आशियात निर्माण होणाऱ्या स्थितीमसवेत जागतिक आणि क्षेत्रीय सुरक्षा मुद्द्यांवर चर्चा होण्याची अपेक्षा आहे. 2 प्लस 2 मंत्रिस्तरीय संवाद एक राजनयिक शिखर परिषद असून याच्या आयोजनास 2018 मध्ये सुरुवात झाली होती. दरवर्षी दोन्ही देशांचे संरक्षण मंत्री आणि विदेशमंत्री यांच्यातील परस्पर चर्चेसाठी ही परिषद आयोजित करण्यात येते.
भारत आणि अमेरिका स्वत:चे रणनीतिक संबंध आणखी दृढ करण्याच्या दिशेने चर्चा करणार आहेत. या बैठकीत युरोपमध्ये सुरू असलेल्या रशिया-युक्रेन युद्धासोबत क्षेत्रावर याच्या पडणाऱ्या प्रभावाबद्दलही चर्चा होण्याची अपेक्षा आहे.
सैन्यतळांचा दौरा शक्य
भारत आणि चीन यांच्यात सुरू असलेल्या तणावाचा मुद्दा देखील 2 प्लस 2 चर्चेत उपस्थित होणार आहे. तसेच अमेरिकेचे संरक्षणमंत्री लॉयड ऑस्टिन हे भारताच्या प्रमुख सैन्यतळांचा दौरा करू शकतात. यापूर्वी अमेरिकेत झालेल्या 2 प्लस 2 चर्चेवेळी भारतीय संरक्षण मंत्र्यांना अमेरिकेतील एका महत्त्वपूर्ण सैन्यतळावर आमंत्रित करण्यात आले होते.
सैन्य हार्डवेअरसंबंधी सहकार्य
अमेरिकेकडून सैन्य हार्डवेअर सहकार्यावर भर दिला जाण्याची शक्यता आहे. तर भारताकडून स्वदेशी शस्त्रास्त्र प्रणालींच्या विकासासाठी उच्चस्तरीय तंत्रज्ञान उपलब्ध करण्याची मागणी केली जाऊ शकते. भारत आणि अमेरिकेने अलिकडेच भारतीय संरक्षण दलांसाठी 31 एमक्यू 9बी प्रिडेटर ड्रोनच्या पुरवठ्यासाठी 3 अब्ज डॉलर्सचा करार केला आहे. अमेरिकेकडून 6 अतिरिक्त पी-8आय टेहळणी विमानांच्या विक्रीवरही जोर दिला जात आहे. अमेरिकेने अलिकडच्या काळात विविध एअर शो तसेच सरावांदरम्यान भारतीय संरक्षण दलांसाठी बी-1 सारख्या स्वत:च्या बॉम्बवर्षक विमानांचेही सादरीकरण केले आहे.
इस्रायल-हमास संघर्ष
इस्रायल आणि हमास यांच्यातील संघर्षामुळे पश्चिम आशियात निर्माण झालेली स्थिती पाहता दोन्ही देशांचे नेते जागतिक आणि क्षेत्रीय सुरक्षेच्या मुद्द्यांवर चर्चा करणार आहेत. या संघर्षात अमेरिकेने इस्रायलची बाजू घेतली असून प्रसंगी सैन्य मदत करण्याची अप्रत्यक्ष तयारीही दर्शविली आहे. तर भारताने देखील इस्रायलला पाठिंबा दर्शविला असला तरीही दोन राष्ट्रांच्या संयुक्त राष्ट्रसंघाच्या तोडग्याच्या अंमलबजावणीचा उल्लेख केला आहे. इस्रायल हा भारताचा प्रमुख शस्त्रास्त्र पुरवठादार देश आहे.









