शिवसेना फुटीनंतर होणाऱ्या आजच्या दुसऱ्या दसरा मेळाव्यासाठी उद्धव बाळासाहेब ठाकरे व मुख्यमंत्री एकनाथ शिंदे या शिवसेनेच्या दोन्ही गटांनी कंबर कसली आहे. पुढील वर्षी लोकसभा तसेच महापालिका निवडणुका होण्याची शक्यता असल्याने आजच्या दसरा मेळाव्याला अनन्यसाधारण महत्त्व असून पुढच्या दसरा मेळाव्यापर्यंत खरी शिवसेना कोणाची याचा फैसला मतदारांनी केलेला असेल त्यामुळे आजचा दसरा मेळावा हा केवळ शक्तीप्रदर्शनाच्या दृष्टीनेच नाही तर पक्षाच्या शिर्ष नेतृत्वाच्या कसोटीचा असणार आहे.
शिवसैनिकांसाठी दसरा मेळावा आणि शिवाजी पार्क हे गेली 56 वर्ष तयार झालेले समीकरण आहे. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या दसरा मेळाव्यासाठी अभूतपूर्व गर्दी शिवाजी पार्क येथे जमत होती. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे याच मेळाव्यातून शिवसैनिकांना शिवसेनेची पुढील वाटचाल आणि कार्यक्रम देत असत आणि शिवसैनिक त्याची अंमलबजावणी करताना पुढे दिसत असत. देशातील राजकीय प्रादेशिक पक्षांचा अभ्यास करताना शिवसेनेच्या दसरा मेळाव्याची सर्वांनीच नोंद घेतल्याचे दिसून येते. एक पक्ष, एक नेता, एक मैदान असा आब शिवसेनेच्या दसरा मेळाव्याचा होता, मात्र 16 महिन्यापूर्वी शिवसेनेत फूट पडून ठाकरे व शिंदे असे दोन गट तयार झाले. त्यामुळे गेल्या दोन वर्षात दोन पक्ष-दोन मैदान असा काहीसा हा मेळावा झाला आहे. आता कोणता मेळावा गद्दारांचा आणि कोणता निष्ठावंतांचा हे जरी या पक्षातील नेते जनतेला ठासून सांगत असले तरी जनता योग्यवेळी कोण गद्दार आणि खुद्दार हे सांगेल यात शंका नाही. आजच्या दसरा मेळाव्यात आगामी निवडणुकीच्या अनुषंगाने जोरदार आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडणार यात शंका नाही. बाकी विचारांचे सोने वगैरे काहीही आजच्या मेळाव्यात असेल असे वाटत नाही. उध्दव ठाकरे हे राज्यातील दुष्काळ, बेरोजगारी, हिंदूत्व, मराठा आरक्षण, ललित पाटील प्रकरण, आमदार अपात्र प्रकरणी विधानसभा अध्यक्षांना घ्यावयाचा fिनर्णय, सरकारी नोकऱ्यांचे कंत्राटीकरण, या विषयांवर शिंदे गटावर तर हिंदुत्व, मणिपूर, इस्त्रायल युध्द, शिवाजी महाराजांची वाघनखे यावऊन भाजपवर तोफ डागतील तर शिंदे गटाचे प्रमुख मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे पेंद्र व राज्य सरकारची कामगिरी, शासन आपल्या दारी उपक्रम, पूर्ण केलेले प्रकल्प व योजना, दुष्काळावरील उपाययोजना, उध्दव ठाकरेंचे हिंदुत्व यावऊन ठाकरे गटाला लक्ष्य करतील.
बाळासाहेब ठाकरे यांच्या काळातील शिवसेनेच्या दसरा मेळाव्याचा विचार केला तर बाळासाहेबांनी याच मेळाव्यातून देशाच्या प्रश्नांवर आवाज उठविताना थेट देशातील बड्या नेत्यांबरोबरच शत्रु राष्ट्रांनाही वेळोवेळी इशारा दिला होता. दसरा मेळावा म्हणजे शिवसैनिकांसाठी एक पर्वणीच होती. विचारांचे सोने लुटण्यासाठी शिवसैनिक शिवाजी पार्कवर लाखोंच्या संख्येने पद, पैसा, प्रतिष्ठा नसताना येत असत. व्यासपीठावर उपस्थित असलेल्या नेत्यांनाही प्रसंगी बाळासाहेब झापत असत. आजही त्यांच्या नावाचा त्यांच्या फोटोचा भाजप, ठाकरे आणि शिंदे गट यांना आधार घेऊन बाळासाहेबांचे खरे वारस असल्याचे सांगावे लागत आहे, यातच बाळासाहेबांचा करीष्मा आजही कायम असल्याचे दिसून येते.
मात्र याच बाळासाहेबांच्या शिवसेनेचे दोन गट झाल्यानंतर गेल्या वर्षीच्या दसरा मेळाव्याच्या शिवाजी पार्क मैदानावऊन दोन्ही गटात रणकंदन माजले होते. गेल्या वर्षीची तणावपूर्व स्थिती यंदाही निर्माण झाली होती. मात्र शिंदे गटाने शिवाजी पार्कवरील आपला दावा मागे घेतल्याने ठाकरे गटाचा मार्ग सुकर झाला असून या मेळाव्याची आठवडाभर जय्यत तयारी सुऊ आहे. त्याचवेळी शिंदे गटानेही आझाद मैदान येथे मेळावा घेण्याची तयारी पूर्ण केली आहे. आता कोण किती गर्दी जमवतो याचीच स्पर्धा असणार आहे. बाळासाहेबांनी याच मेळाव्याच्या माध्यमातून मराठी माणसाला ताकद दिली. स्वत:च्या अस्तित्वाची जाणीव कऊन दिली. मराठी मनगटाला बळ दिले, स्थानिय लोकाधिकार समिती, भारतीय कामगार सेना या युनियनच्या माध्यमातून मराठी लोकांना नोकऱ्या दिल्या. मराठी माणूस प्रशासकीय सेवेत कसा जाईल, प्रत्येक क्षेत्रात मराठी माणसाने भरारी घेतली पाहिजे, यासाठी बाळासाहेबांचा नेहमीच आग्रह राहीला होता आणि अशा कर्तृत्ववान लोकांचा ते दसरा मेळाव्यात आवर्जुन उल्लेख करत असत. गौरव करत असत मग तो भारतीय हॉकी संघाचा कर्णधार धनराज पिल्ले असो सुनिल गावस्कर असो किंवा डॉ. नितू मांडके असो मात्र आताच्या मेळाव्यात फक्त आणि फक्त पक्षात प्रवेश करणाऱ्यांचा मोठा सत्कार केला जातो.
आज मुंबईत मराठी माणसाच्या हक्काचा प्रश्न वेळोवेळी निर्माण होऊ लागला आहे. मराठी माणसाला मुंबईत घर घेण्यास नाकारले जात आहे. मुलुंडच्या घटनेनंतर आता मिरारोड भाईंदरमध्येही असाच प्रकार झाल्याचे कालच समोर आले आहे, याबाबत मराठी माणसाचा कैवार घेणाऱ्या शिवसेनेच्या दोन्ही गटाने काय केले? मनसेने मात्र यात तात्काळ भूमिका घेतली. अपार मेहनत आणि स्वत:च्या कर्तृत्वावर शुन्यातून 150 एकरात मोठा स्टुडिओ उभारणारा कला दिग्दर्शक नितीन देसाई यांनी फायनान्स कंपनीच्या जाचाला कंटाळून आत्महत्या केली. आत्महत्या करताना लिहिलेल्या चिठ्ठीत आपल्यावर अन्याय झाल्याचे सांगताना माझा स्टुडिओ सरकारने ताब्यात घ्यावा असेही लिहीले होते. मात्र सरकारकडून काहीच झाले नाही. उलट देसाईंच्या मृत्युवऊनही दोन चार दिवस चांगलेच राजकारण तापले. महाराष्ट्रतील प्रादेशिक पक्षांची पडलेली शकले हीच महाराष्ट्राच्या अधोगतीला कारणीभूत ठरणार आहेत. मात्र सध्या तरी मेळाव्याला कोण किती गर्दी जमवतो हेच महत्त्वाचे आहे. राज्यात शिक्षणासारख्या क्षेत्रात कंत्राटीकरण, पोलीस भरती कंत्राटी पध्दतीने, तहसीलदारसारखे महत्त्वाचे पद कंत्राटी पध्दतीने भरण्यासाठी जाहिरात निघणे, जे स्पर्धा परीक्षा पास झालेत त्यांना अद्याप नियुक्ती पत्र नाही, शेतकऱ्यांना पिकाला हमीभाव नाही, राज्यातील काही भागात दुष्काळाची स्थिती आहे, सरकारला त्याचे काही सोयर ना सुतक, ड्रग्ज माफीया ललित पाटील प्रकरणाने तर सरकारची पार लक्तरे काढलीत. महाराष्ट्रात दोन प्रमुख प्रादेशिक पक्षांचे दोन गट एक सत्तेत तर एक विरोधात आणि दोन राष्ट्रीय पक्ष एक सत्तेत तर एक विरोधात प्रादेशिक पक्षांमध्ये जितकी फुट पडणार, तितके राज्य कमकुवत होणार हे मात्र नक्की.
प्रवीण काळे








