आरोग्यमंत्री विश्वजित राणे यांची माहिती
पणजी : गोव्यासाठी आणखी 25 रुग्णवाहिकांची (108) गरज असून त्या आरोग्य खात्याला मिळवून देण्यासाठी प्रस्ताव देण्यात आला असल्याची माहिती आरोग्यमंत्री विश्वजित राणे यांनी दिली आहे. सध्या गोव्यात 56 रुग्णवाहिका (108) असून त्या कमी पडत असल्याचे ते म्हणाले. बांबोळी येथील गोमेकॉ इस्पितळाला आरोग्यमंत्र्यांनी काल रविवारी भेट देवून तेथील पहाणी केली. त्यानंतर प्रसार माध्यमाशी बोलताना त्यांनी सांगितले की, राज्यात यापूर्वी अपघातप्रवण जागा कमी होत्या. आता त्यात वाढ झाली असून अपघातही वाढले आहेत. त्यात सापडलेल्या लोकांचे जीव वाचवायचे असतील आणि रुग्णवाहिका त्या ठिकाणी पोहोचायची असेल तर आणखी किमान 25 रुग्णवाहिका आवश्यक आहेत. त्या आल्या तर अपघाताच्या ठिकाणी लवकर पोहोचता येईल आणि लवकर उपचार करणे शक्य होईल.
गोव्याची आरोग्य व्यवस्था सक्षम
गोव्याची आरोग्य व्यवस्था सक्षम असून देशात कोणत्याही राज्यात 108 सारखी सेवा नाही. लोकांचे जीव वाचवणे हे सरकारचे कर्तव्य असून त्यात कुचराई होता कामा नये. गोव्यातील 108 रुग्णवाहिका अत्याधुनिक आणि सक्षम असून त्या जनतेच्या उपयोगी पडत आहेत. अपघात व इतर प्रसंगी या रुग्णवाहिकांनी चांगली कामगिरी केली असून अनेक अपघातग्रस्तांचे जीव वाचले आहेत तसेच अनेक बाळांचे जन्म या रुग्णवाहिकेत झाले असल्याचे राणे यांनी सांगितले.
मडगावात लवकरच ‘आयसीयू’ विभाग
जनतेला जास्तीत जास्त मोफत आरोग्य सेवा उपलब्ध व्हावी हा आमचा, सरकारचा प्रयत्न असून मडगावच्या दक्षिण गोवा जिल्हा इस्पितळात सर्व प्रकारच्या आरोग्य सेवा देण्यावर सरकारचा भर आहे. तेथे आयसीयूची तयारी करण्यात आली असून त्यासाठी कर्मचारी वर्गाची गरज आहे. त्यांची भरती केल्याशिवाय पुढे जाता येणार नाही.
लसीकरण सर्व केंद्रांतून मोफत
लसीकरणासाठी याआधी मुलांना घेऊन मातांना-भगिनींना खासगी डॉक्टरांकडे जावे लागत असे. तेथे पैसे देऊन लसीकरण करावे लागायचे. आता ती सोय बहुतेक सर्व आरोग्य केंद्रांतून मोफत देण्यात आली आहे. लोकांना सर्व प्रकारची आरोग्य सेवा मोफत मिळावी म्हणून सरकार धडपड करत असल्याचे राणे यांनी नमूद पेले.









