न्यूझीलंडवर चार गडी राखून विजय : विकेटच्या पंचकासह शमीचे जोरदार कमबॅक : विराटची 95 धावांची झुंजार खेळी
वृत्तसंस्था/ धरमशाला
आयसीसी क्रिकेट वर्ल्डकप स्पर्धेत रविवारी विराट कोहलीचे शानदार अर्धशतक (95) व सामनावीर मोहम्मद शमीच्या पाच विकेटच्या बळावर भारताने न्यूझीलंडवर 4 गडी राखून विजय मिळवला. प्रारंभी, शमीच्या भेदक माऱ्यापुढे न्यूझीलंडचा डाव 50 षटकांत 273 धावांत संपुष्टात आला. यानंतर भारताने विजयासाठीचे 274 धावांचे लक्ष्य 48 षटकांत सहा गड्यांच्या मोबदल्यात पूर्ण केले. भारताचा हा वर्ल्डकपमधील सलग पाचवा विजय आहे.
प्रारंभी, न्यूझीलंडने विजयासाठी दिलेल्या 274 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना भारताची सुरुवात शानदार झाली. सलामीवीर रोहित शर्मा व शुभमन गिल यांनी 11.1 षटकांत 71 धावांची सलामी दिली. रोहितने नेहमीप्रमाणे आक्रमक खेळताना 40 चेंडूत 4 चौकार व 4 षटकारासह 46 धावा केल्या. पण, खराब चेंडूवर तो फर्ग्युसनच्या गोलंदाजीवर बाद झाला. यानंतर गिललाही फर्ग्युसनने 26 धावांवर तंबूचा रस्ता दाखवला. विराट कोहली व श्रेयस अय्यर यांनी एकेरी दुहेरी धावांवर भर देत संघाचा धावफलक हलता ठेवला. ही जोडी मैदानात स्थिरावलेली असताना अय्यरला बोल्टने बाद केले. त्याने 6 चौकारासह 33 धावांचे योगदान दिले.
विराटचे अर्धशतक
श्रेयस अय्यर बाद झाल्यानंतर विराटने मात्र दुसऱ्या बाजूने किल्ला लढवला. त्याने 104 चेंडूचा सामना करताना 8 चौकार व 2 षटकारासह 95 धावा केल्या. शतकाच्या उंबरठ्यावर असताना मॅट हेन्रीने त्याला बाद केले. केएल राहुलही 3 चौकारासह 27 धावा काढून बाद झाला. यंदाच्या वर्ल्डकपमध्ये पहिला सामना खेळणाऱ्या सूर्यकुमारने देखील निराशा केली. 2 धावांवर तो रनआऊट झाला. विराट व जडेजाने सहाव्या गड्यासाठी 78 धावांची भागीदारी करत संघाच्या विजयात मोलाची भूमिका बजावली. जडेजाने 44 चेंडूत नाबाद 39 धावा केल्या.
टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्माने नाणेफेक जिंकत प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला. कर्णधाराचा हा निर्णय सार्थ ठरवताना तिसऱ्याच षटकात मोहम्मद सिराजने सलामीवीर डेव्हॉन कॉनवेला बाद करत किवीज संघाला पहिला धक्का दिला. त्याला भोपळाही फोडता आला नाही. दुसरा सलामी फलंदाज विल यंगला 19 धावांवर मोहम्मद शमीने तंबूचा रस्ता दाखवला. यंगने 27 चेंडूत तीन चौकारांच्या मदतीने 19 धावांचे योगदान दिले. दोन विकेट झटपट गेल्यानंतर रचिन रवींद्र आणि डॅरील मिचेल यांनी डाव सावरला.
मिचेलचे शानदार शतक, रविंद्रचीही अर्धशतकी खेळी
डॅरेल मिचेल आणि रचिन रवींद्र यांनी तिसऱ्या विकेटसाठी 152 चेंडूत 159 धावांची भागिदारी साकारली. दोघांनीही सुरुवातीला संयमी फलंदाजी केली, त्यानंतर धावांची गती वाढवली. एकेरी दुहेरी धावसंख्या घेत स्कोअरबोर्ड हलता ठेवला. रवींद्रने 87 चेंडूत 75 धावांची खेळी केली. या खेळीमध्ये रवींद्रने एक षटकार आणि सात चौकार लगावले. कठीण परिस्थितीमध्ये मिचेलसोबत न्यूझीलंडच्या डावाला आकार दिला. मात्र, त्याआधी रचिन केवळ 12 धावांवर असताना शमीच्या चेंडूवर रवींद्र जडेजाने त्याचा झेल सोडत त्याला जीवदान दिले. मिशेल आणि रचिन यांच्यातील भागीदारी पाहून न्यूझीलंड सहज 300 हून अधिक धावांचा टप्पा पार करेल असे वाटत होते, परंतु भारतीय गोलंदाजांनी शेवटच्या 10 षटकात शानदार कामगिरी केली. 75 धावांवर रवींद्र बाद झाल्यानंतर न्यूझीलंडची फलंदाजी ढेपाळली. एकापाठोपाठ एक फलंदाज तंबूत परतले. पण दुसऱ्या बाजूला डॅरील मिचेलने धावांचा पाऊस पाडला. मिचेलने 127 चेंडूत 9 चौकार व 5 षटकारासह 130 धावांची खेळी साकारली. कर्णधार टॉम लॅथम स्वस्तात 5 धावांवर बाद झाला. यानंतर 45 व्या षटकात ग्लेन फिलिप्स 23 धावा करून तंबूत परतला. यानंतर शमीने 48 व्या षटकात लागोपाठ दोन विकेट घेत किवीज संघाला चांगलेच दणके दिले. शमीने मिचेल सँटेनर (1) आणि मॅट हेन्रीचा (0) त्रिफळा उडवला. अखेरच्या षटकांत शतकवीर मिचेलला शमीने माघारी धाडले तर लॉकी फर्ग्युसन धावबाद झाल्याने न्यूझीलंडचा डाव 273 धावांवर संपुष्टात आला.
यंदाच्या विश्वचषकात पहिलाच सामना खेळणाऱ्या शमीने न्यूझीलंडच्या पाच फलंदाजांना तंबूत धाडले. शमीने दहा षटकात 54 धावा खर्च केल्या. याशिवाय कुलदीप यादवला दोन विकेट मिळाल्या तर जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद सिराजने प्रत्येकी 1 बळी घेतला.
संक्षिप्त धावफलक : न्यूझीलंड 50 षटकांत सर्वबाद 273 (विल यंग 17, रचिन रविंद्र 75, डॅरेल मिचेल 130, ग्लेन फिलिप्स 23, मोहम्मद शमी 54 धावांत 5 बळी, कुलदीप यादव 2 तर बुमराह व सिराज प्रत्येकी एक बळी).
भारत 48 षटकांत 6 बाद 274 (रोहित शर्मा 46, शुभमन गिल 26, विराट कोहली 95, श्रेयस अय्यर 33, केएल राहुल 27, सूर्यकुमार यादव 2, )