हा सामना सुरू होण्याअगोदर दोन्ही संघांचे चार विजय. अर्थात आठ गुण. पाचवा विजय मिळवत 10 गुण गाठत 99 टक्के उपांत्य फेरीचे दरवाजे उघडे करायचे हे दोन्ही संघांचे इरादे. एकीकडे केन विल्यम्सन आणि दुसरीकडे हार्दिक पंड्या दुखापतग्रस्त होता. परंतु या दोघांच्या अनुपस्थितीमुळे सामन्याचे महत्त्व कमी झाले का? तर मुळीच नाही. या सामन्याला भारत-पाक पारंपरिक युद्धापेक्षा काकणभर जास्त महत्व मी या सामन्याला देईन. त्याचं कारण तसं होतं. ते म्हणजे 2019 मधला तो विश्वचषकातील उपांत्य फेरीतला पराभव. आयसीसी स्पर्धेतील शेवटचा विजय 2003 मध्ये आपण न्यूझीलंडविरुद्ध मिळवला होता. त्यानंतर तब्बल वीस वर्षे भारतीय संघाला वाट पहावी लागली. मधल्या काळात रंभा उर्वशी यांनी जसे ऋषीमुनींचा तपोभंग केला होता तसा काहीसा तपोभंग त्यांच्या क्षेत्ररक्षक गोलंदाजांनी केला. सरते शेवटी तपश्चर्या फळास आली.
असो. नाणेफेक रोहितने जिंकल्यानंतर पहिल्या 10 षटकात भारतीय गोलंदाजाबरोबर चेंडूचं नातं मैत्रिणीसारखं होतं. परंतु पुढच्या वीस षटकात किवीच्या फलंदाजासोबत पत्नीसारखं कधी बदललं हे कळलच नाही. ज्यावेळी एखादा विद्यार्थी दहावीत 95 टक्के गुण घेत प्रथम येतो परंतु त्याच विद्यार्थ्याला बारावीत फक्त 60 टक्के गुण मिळतात, त्यावेळी त्या विद्यार्थ्याची जी अवस्था झालेली असते तशीच काहीशी अवस्था रचीन रवींद्र आणि डॅरेल मिचेल यांनी भारतीय गोलंदाजांची केली. या दोघांची दीडशतकी भागीदारी खऱ्या अर्थाने बुस्टर डोस होता. पहिल्या 10 षटकात भारतीय गोलंदाजांनी आणि न्यूझीलंडच्या फलंदाजांनी लर्निंग लायसन्स काढलं खरं, परंतु त्या लर्निंग लायसन्सचे परमनंट लायसन्समध्ये रूपांतरित करण्यात किवीचे खेळाडू यशस्वी ठरले. त्यातच भारतीय क्षेत्ररक्षक आणि सोडलेले तीन लॉलीपॉप झेल. मनातल्या मनात मी म्हणत होतो की, कुणीतरी धर्मशालात जावं आणि भारतीय क्षेत्रक्षकांची दृष्ट काढावी एवढं खराब क्षेत्ररक्षण काल बघायला मिळाले. बघाना, या क्रिकेट विश्वचषकात क्रिकेट आपला रंग कसा दाखवतोय. ज्या रवींद्र जडेजा, के एल राहुलने अविश्वसनीय झेल घेतले त्यांनी साधे सोपे झेल धरणीमातेला दान केले. विश्वचषक स्पर्धेत भारतीय चमूने एक चांगला पायंडा टाकला आहे. सामना संपल्यानंतर उत्कृष्ट क्षेत्ररक्षकाला गोल्ड मेडल देऊन ड्रेसिंग रूममध्ये सन्मानित केलं जातं. पहिल्या चार सामन्यात सर्व काही ठीकठाक असताना पाचव्या सामन्यात भारतीय क्षेत्ररक्षक हाताला व्हॅसलीन लावून आले होते का, असे वाटत होते. हाच विश्वचषकातील दबाव असतो आणि त्या दबावाला भारतीय अपवाद नव्हते हेही तेवढेच खरं. क्रिकेटमध्ये बॅट कॅरी करणे म्हणजे काय ते सेहवागला विचारा. (भारत विरुद्ध श्रीलंका कसोटी सामना) आणि आज झटपट गडी बाद झाल्यानंतर खेळपट्टीवर नांगर कसा टाकावा ते आज मिचेलला विचारा.
या खेळपट्टीवर 273 ही धावसंख्या तशी समाधानकारक तर दुसऱ्या बाजूने काहीशी छोटी. या स्पर्धेतील पाचव्या पेपरची सुरुवात जोड्या लावा व गाळलेल्या जागा भरा या प्रश्नाने न करता संदर्भासहित स्पष्टीकरण देत रोहित आणि गिलने भारतीय संघाचा पाया मजबूत रचला. त्यानंतर दोन झटपट गडी बाद झाल्यानंतर विराट कोहलीने संघाला सावरलं ते निश्चितच कौतुकास्पद. स्पेशल शाकाहारी थाळीत श्रीखंडाची वाटी नाही आणि विराटच्या खेळीत कव्हर ड्राईव्ह नाही हे फारच विरळ बघायला मिळतं. फार पूर्वी दिलीप वेंगसरकर व इंग्लंडचा डेव्हिड गोवर यांचा कव्हर ड्राइवर ट्रेडमार्क होता. परंतु ज्या पद्धतीने कालच्या सामन्यातून कोहलीच्या बॅटच्या पट्ट्यातून कव्हर ड्राईव्ह निघाले, त्यावरून असेच म्हणावे लागेल की सद्यस्थितीत क्रिकेटमधील सर्वोत्कृष्ट फटक्याचे अर्थातच कव्हर ड्राईव्हचे सर्वाधिकार त्याने आपल्याकडेच राखून ठेवले असावेत. ज्या पद्धतीने सूर्यकुमार बाद झाला ते पाहून विराट निश्चित नाराज झाला असावा. परंतु घबराओ मत मै हू ना, असं तो मनोमनी म्हणत असावा. या सामन्यातून नियोजनबद्ध खेळ केल्यास कसा विजय मिळवता येतो हे भारताने दाखवून दिलं. चला, वीस वर्षाचा दुष्काळ तर संपला. पुन्हा एकदा थँक्यू व्हेरी मच विराट कोहली! धावफलकावर पाया मजबूत असो वा नसो धावांचा पाठलाग करताना तो पाया मजबूत करतोच. त्याचबरोबर मोठमोठ्या इमारतीही रचतो. भारताने विजयाचा पंजा गुणफलकावर उमटवत आपले सुपर फोरचे स्थान पक्के केले एवढे मात्र खरं.