20 हजार फूट उंचीवर तैनात, लष्कराकडून मानवंदना
वृत्तसंस्था/ श्रीनगर
भारतीय लष्कराचे जवान केवळ मैदानावरच नव्हे तर दुर्गम आणि हजारो फूट उंच पर्वतांवरही सतर्क राहतात. देशाची सेवा करताना अनेकवेळा सैनिक आपल्या प्राणांची आहुती देतात. नुकतेच असेच एक प्रकरण सियाचीनमधून समोर आले आहे. सियाचीनमध्ये 20 हजार फूट उंचीवर सेवा बजावत असताना एका अग्निवीर जवानाने आपल्या प्राणाची आहुती दिली आहे. गवते अक्षय लक्ष्मण असे अग्निवीर जवानाचे नाव असून तो भारतीय लष्कराच्या फायर अँड फ्युरी कॉर्प्सचा भाग होता.
सियाचीन शिखरावर तैनात अग्निवीर गवते अक्षय लक्ष्मण याचा ड्युटीवर असताना मृत्यू झाला आहे. लष्करी सेवेत अस
ताना आपला जीव गमावणारा गवते अक्षय लक्ष्मण हा पहिला अग्निवीर ठरला आहे. हुतात्मा जवानाला श्र्रद्धांजली अर्पण करताना, भारतीय लष्कराने अधिकृत ‘एक्स’ हँडलवर एक पोस्ट शेअर केली. या पोस्टमध्ये भारतीय लष्कराने ड्युटीवर असताना आपला जीव गमावणारा पहिला अग्निवीर म्हणून गवते अक्षय लक्ष्मणचा उल्लेख केला आहे. मात्र, लष्कराने अक्षय लक्ष्मणच्या नावापुढे हुतात्मा असे लिहिलेले नाही. अग्निवीर अक्षय लष्कराच्या फायर अँड फ्युरी कॉर्प्सचा भाग असल्याचे लष्कराने पोस्टमध्ये म्हटले आहे. “सियाचीनच्या कठीण उंचीवर कर्तव्य बजावताना प्राण गमावलेल्या अग्निवीर गवते अक्षय लक्ष्मणच्या सर्वोच्च बलिदानाला लष्कर सलाम करते”, असे भारतीय लष्कराने पोस्टमध्ये लिहिले आहे.
हुतात्मा दर्जा देण्यावरून वाद
अलीकडेच अग्निवीरांच्या मृत्यूला हुतात्माचा दर्जा देण्यावरून बराच वाद झाला होता. काश्मीरमध्ये नियंत्रण रेषेवर तैनात अग्निवीर अमृतपाल सिंह यांचा 11 ऑक्टोबर रोजी मृत्यू झाला तेव्हा भारतीय लष्कराने हा मृत्यू आत्महत्या मानला आणि या कारणास्तव लष्कराने त्यांना राज्य सन्मान दिला नाही. त्याचवेळी अग्निवीरच्या कुटुंबीयांनी आपल्या मुलाचा कर्तव्यावर असताना मृत्यू झाला असून तो आत्महत्या करू शकत नाही, असा दावा केल्यानंतर बराच काळ वाद सुरू होता.