पू. पांडुरंगशास्त्राr आठवले यांनी ‘श्रीसूक्तम्’ या त्यांच्या ग्रंथात एक गोष्ट सांगितली आहे. ब्रह्मदेवाने जेव्हा सृष्टी निर्माण केली तेव्हा ती रडत होती. ब्रह्मदेवाने तिला विचारले, ‘तू का रडतेस?’ तेव्हा ती म्हणाली, ‘माझ्या अंगाचा विलक्षण दाह होतो आहे म्हणून मी रडते आहे’. पृथ्वीचा दाह शांत व्हावा म्हणून ब्रह्मदेवाने मानवाची निर्मिती केली. मानवाने सृष्टीला ‘सुजलाम सुफलाम’ केले, सुंदर केले, घाम गाळला, अश्रू गाळले, रक्त सांडले तरीही पृथ्वी रडतच होती. तिच्या अंगाचा दाह काही केल्या शमत नव्हता. तेव्हा ब्रह्मदेव या रडक्या कन्येला सोडून, खरे म्हणजे कंटाळून निघून गेले. नंतर बराच काळ लोटल्यावर एके दिवशी ब्रह्मदेवाला पहाटे, पहाटे सुमधुर मंगल गीत ऐकू आले. हे गीत कोण गाते आहे याचा ब्रह्मदेवाने शोध घेतल्यानंतर त्याला कळले की ही गाणे गाणारी मुलगी आपली कन्या पृथ्वी आहे. त्याने पृथ्वीला विचारले, ‘तुझा दाह कशामुळे शांत झाला?’ तेव्हा पृथ्वी हसून म्हणाली, ‘पृथ्वीवर रामराज्य नांदते आहे. सर्व माणसांनी एकमेकांमध्ये स्नेहबंधाचा पूल बांधला आहे. म्हणून माझा दाह शांत झाला आहे.’ पृथ्वी आणि श्रीराम यांचे नाते जगावेगळे आहे. पृथ्वी ही रामरायांची सासू आहे. ती सीतेची आई, त्यामुळे श्रीराम मंद, मंद पावले टाकीत जमिनीवरून मान ताठ करून चालतात. श्रीराम आणि सीता यांच्या विरहामधला सुसह्य दुवा म्हणजे भूमी आहे. नगर येथील प. पू. रामकृष्ण क्षीरसागर महाराज म्हणतात की, ‘रामायणामध्ये जमिनीला संदेशवाहक म्हटले आहे. जमिनीमधल्या लहरी संदेश पाठवत असतात. परंतु हे संदेश सामान्य माणसाला कळतील असे नाही. त्यासाठी पात्रता असावी लागते. सीतामाई जेव्हा अशोकवनात होत्या तेव्हा भूमीद्वारे श्रीराम आणि सीता एकमेकांना संदेश पाठवत होते. श्रीराम हे प्रत्यक्ष परमात्मा आणि सीतामैया महाशक्ती असल्यामुळे पात्रतेचा प्रश्न नव्हता.
पाश्चात्य लेखक विलियम ब्लू असे म्हणतात की ‘माणसाने नेहमी भूसंधित असले पाहिजे. म्हणजे भूमीशी जोडून असले पाहिजे.’ सामान्यत: माणसांना स्वत:च्या शरीराची जाणीव कमी प्रमाणात असते. त्यांचे मन भरकटत असते आणि अवधान हे कल्पनाविचार, भावनांवर केंद्रित झाले असते. आजकाल आपण अंगमेहनतीची कामे कमी करतो. त्यामुळे शरीराचा कमी वापर होतो आणि भूमीशी जोडून राहता येत नाही. पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षण शक्तीमुळेच आपण स्थिर आहोत. पुष्कळदा असा अनुभव येतो की संतांच्या घरी किंवा एखाद्या जागृत देवस्थानात पाऊल टाकले की आनंदाच्या लहरी जाणवायला सुरुवात होते. तिथे मुक्काम केल्यास शांत झोप लागते. शुभ स्वप्ने पडतात. संत एखादी जागा मुद्दाम निवडतात. पृथ्वीच्या पोटातून जाणाऱ्या भूगर्भरेखा संतांना जाणवतात. जिथे गुरुत्वाकर्षण शक्ती जास्त असते तीच जागा संत वास्तव्यासाठी निवडतात. कारण तिथे सत्वगुण वाढीस लागण्याची निसर्गदत्त व्यवस्था असते. अशी भूमी साधनेसाठी उत्तम असते. म्हणून संत अनुष्ठानासाठी जाणीवपूर्वक अशा जागेची निवड करतात. संत गजानन महाराजांचे शेगाव असो की स्वामी समर्थांचे अक्कलकोट, विठुरायाचे पंढरपूर, चोखामेळ्याचे मंगळवेढा किंवा ब्रह्मचैतन्य महाराजांचे गोंदवले. आजसुद्धा ही गावे छोटी आहेत. या गावांचा फारसा विकास झालेला नाही तरी तिथे भक्तांची अमाप गर्दी लोटते. भक्तांना आजही साक्षात्कार होतो. कारण भूमीची प्रचंड ऊर्जाशक्ती तिथे असल्यामुळे ही किमया घडते.
देवीच्या नवरात्राची पूजा ही पृथ्वीपूजाच आहे. निसर्गलावण्याने बहरलेल्या पृथ्वीची पूजा म्हणजेच शक्तिपूजा. पृथ्वीच्या पोटात मोठा शक्तीचा स्रोत आहे. पाश्चात्य विद्वान म्हणतात की तुम्ही स्वत:ला पृथ्वीच्या आत असलेल्या खोल संवेदनांशी जोडून घेतले तर तुमचे अनेक आजार पृथ्वी बरे करते. आपला देह हा पृथ्वीतत्त्वाचा असून तो गुरुत्वाकर्षणाने बांधला आहे. माणसाच्या देहात सात चक्रे असून ती ऊर्जाकेंद्रे आहेत. पृथ्वीकडून संवेदना घेऊन या ऊर्जाकेंद्राद्वारे उलट पृथ्वीच्या आत पाठवल्या तर शक्तीची मुळे जमिनीत खोलवर रुजतात. पायात धातूचे कडे घालून पृथ्वीमधील संवेदना खेचून घेता येते. भारतामध्ये अनेक देवस्थाने अशी आहेत की तेथील मूर्ती या पृथ्वीच्या पोटात सापडल्या. त्या त्या देवतांनी आपल्या भक्तांना दृष्टांत देऊन स्वत:ला प्रकट करून घेतले. बाराही
ज्योतिर्लिंगे ही स्वयंभू आहेत. बहुतेक साधनागृहात तळघर किंवा गुहा असते. पृथ्वीच्या आत खोलात असलेली ऊर्जा साधनेला पूरक ठरते. जपासाठी वापरण्यात येणाऱ्या आसनाची पद्धत ही पृथ्वीशी जोडली आहे. जप करताना तो लाकडी पाटावर बसून करू नये असे शास्त्र आहे. जप करताना पाट आसन म्हणून घेतला की साधकाचा आणि भूमीचा प्रवाही संबंध संपतो. मंत्रजपाच्या वेळी शरीरात जी वीज निर्माण होते तिचे नियंत्रण भूमी करते. पाट लाकडाचा असल्यामुळे जरुरीपेक्षा अधिक निर्माण होणारी वीज निघून जायला पाटामुळे अडथळा निर्माण होतो. त्यामुळे अंगात उष्णता वाढते आणि साधकाला जप करताना ग्लानी येते, असे थोर विद्वान स. कृ. देवधर यांनी म्हटले आहे. सात्विक आसने घेतल्याने साधकाच्या शरीरात निर्माण होणारी अतिरिक्त ऊर्जा जमिनीत निघून जाते आणि साधकाची वृत्ती बदलते. पृथ्वी ही आदिशक्ती आहे. देवीच्या नवरात्रात घटपूजा असते. घट हा मातीचा असतो. माती ही पवित्र असते. यज्ञोपवीत बदलताना भारतीय संस्कृतीमध्ये डोक्यावर माती धारण करून ‘मृतिके हन्मे पाप!’ ..हे माती माझे पाप दूर कर असे म्हणतात. श्री रामचंद्र देखील ‘जननी जन्मभूमीश्च स्वर्गादपि गरियसी’ म्हणून अयोध्येची माती लंकेमध्ये नित्यपूजनासाठी घेऊन गेले होते. मातीमध्ये श्वसनक्षमता असते. म्हणून उपास्य देवतेची मूर्ती ही मातीची घडवतात. कारण तिच्यात प्राणप्रतिष्ठेनंतर सजीवता येते.
मानवी शरीर हा सुद्धा एक घटच आहे. मातीतून उगवलेला आणि मातीमध्ये मिसळून जाणारा मानवी देह आहे. पृथ्वी ही आपली माता आहे हे जाणून पृथ्वीवर प्रेम करायला हवे. तिचा मान राखायला हवा. शेवटी मृत्यू देणारीही तीच आहे. पृथ्वीच्या उपासकांना पृथ्वीचे आशीर्वाद लाभतात. माणसाच्या शरीरामधला प्राण निघून गेला तरी जीव इहलोकामध्ये अडकलेला असतो. तो पृथ्वीवरच घुटमळत असतो. देह सुखाचे अनंत उपभोग घेताना मन देहात अडकून बसते. त्यामुळे देहत्यागाच्या वेळी जिवाला फार यातना होतात, असे शास्त्र म्हणते. देह आणि मन एकमेकांना चिकटल्याने प्राण उचलताना देहाला यातना होतात. पृथ्वीची उपासना करणाऱ्या माणसाला अंतिम क्षणी पृथ्वी आशीर्वाद देते व पृथ्वीतत्त्वापासून देह क्षणात विलग होतो. त्याला प्रकाशाची वाट गवसते आणि तो अन्नमय कोशातून बाहेर पडून उन्नतीच्या दिशेने रवाना होतो.
आध्यात्मिक प्रगतीसाठी आणि उर्ध्वगतीसाठी पृथ्वीशिवाय दुसरा आधार नाही. म्हणून रात्रभराचा निद्राअनुभव घेतल्यानंतर अर्थात छोटासा मृत्यू अनुभवल्यानंतर पहिला नमस्कार हा पृथ्वीला करायचा असतो. ‘समुद्रवसने देवी पर्वतस्तनमंडले, विष्णुपत्नी नमस्तुभ्यं पादस्पर्शं क्षमस्व मे!’ हा श्लोक रोज म्हणायचा आहे. त्यामुळे पृथ्वीचा आशीर्वाद मिळून दिवसाची सुरुवात चांगली होते. मानवी मनात वसत असलेल्या शक्तीचा वापर करून सत्कर्म, सदाचार निर्माण करीत ही भूमी समृद्ध, संपन्न करायला हवी. जन्म देणारी भूमी आणि जीवित हेतू पूर्ण झाल्यावर आपल्या उदरात पुन्हा सामावून घेत नव्या निर्मितीची वाट मोकळी करणारीही भूमीच. म्हणून संत नामदेव म्हणतात, ‘कोंभाची लवलव, सांगे भूमीचे मार्दव.’ आई अर्थात मानवाची जन्मदात्री हे भूमीचेच एक रूप आहे. भूमीचे आणि माणसाचे नाते चिरंजीव आहे.
-स्नेहा शिनखेडे








