हिंदुत्वनिष्ठ संघटनांची जोरदार मागणी, सनातन धर्माबद्दल आक्षेपार्ह विधान
प्रतिनिधी/ पणजी
सनातन धर्माविषयी आक्षेपार्ह वक्तव्य करणारे तामिळनाडूचे मंत्री उदयनिधी स्टॅलिन, मंत्री प्रियांका खर्गे आणि खासदार ए. राजा यांच्याविरोधात द्वेषमूलक विधाने (हेट स्पीच) केल्याप्रकरणी गुन्हे नोंद करावेत, अशी जोरदार मागणी राज्यातील हिंदुत्वनिष्ठ संघटनांनी केली आहे.
शनिवारी पणजीत आझाद मैदानावर आयोजित राष्ट्रीय हिंदू राष्ट्र जागृती आंदोलनाच्या माध्यमातून या संघटना एकत्र आल्या होत्या. हेट स्पीच करणाऱ्यांना संविधानिक पदांवर राहण्याचा अधिकार नाही. त्यामुळे त्यांना विधीमंडळ आणि संसदेतून बडतर्फ करण्यात यावे, अशी मागणीही यावेळी करण्यात आली.
तामिळनाडूचे मंत्री उदयनिधी स्टॅलिन, मंत्री प्रियांका खर्गे आणि खासदार ए. राजा यांनी सनातन धर्माबद्दल आक्षेपार्ह विधान केले होते. त्यामुळे समाजात धार्मिक तेढ आणि संघर्षाची स्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे या तिघांच्याही विरोधात गुन्हे नोंद करण्यात यावे, अशी जोरदार मागणी सदर संघटनांनी केली आहे.
‘अभिव्यक्ती स्वातंत्र्या’च्या नावाखाली आज हिंदुविरोधी लोक धर्मनिरपेक्षतेच्या आडून हिंदू धर्मावर आसूड ओढण्याचे प्रयत्न करत आहेत. स्टॅलिन, खर्गे, व राजा यांनी तर अत्यंत हीन पातळी गाठली असून डेंग्यू, मलेरिया, कोरोना, एड्स, कुष्ठरोग यासारख्या रोगांशी सनातन धर्माची तुलना करणारी वक्तव्ये त्यांनी केली आहेत. त्यातही समाधान न झाल्याने ‘सनातन धर्मा’लाच नष्ट करण्याची भाषा बोलण्यापर्यंत त्यांची मजल गेली आहे. बहुसंख्य हिंदू समाजाच्या धार्मिक श्रद्धेवर घाला घातला जात आहे, असे आरोप करण्यात आले.
हिंदू जनजागृती समितीचे युवराज गावकर यांनी प्रारंभी आंदोलनाचा उद्देश स्पष्ट केला. यानंतर हिंदुत्वनिष्ठांनी उपस्थितांना संबोधित केले. समितीचे दक्षिण गोवा समन्वयक सत्यविजय नाईक यांनी सूत्रसंचालन आणि आभारप्रदर्शन केले.









