वृत्तसंस्था/ धर्मशाला
विश्वचषक स्पर्धेत आज रविवारी भारताचा सामना न्यूझीलंडशी होणार असून भारताला आता हार्दिक पंड्याशिवाय विश्वचषक मोहीम पुढे न्यावी लागणार आहे. बांगलादेशविरुद्धच्या लढतीवेळी झालेल्या घोट्याच्या दुखापतीमुळे पंड्या किवीजविऊद्धच्या महत्त्वाच्या सामन्यातून बाहेर पडला आहे. न्यूझीलंड प्रथमच विश्वचषक जिंकण्याची महत्त्वाकांक्षा बाळगून आहे, तर यजमान भारतही बऱ्याच काळापासून हुलकावणी देणाऱ्या ‘आयसीसी’ चषकावर आपले नाव कोरण्याची इच्छा बाळगून त्यादृष्टीने दमदार पावले टाकत आलेला आहे.

अष्टपैलू पंड्या उपलब्ध नसल्यामुळे चार विजय मिळवून देणारी संघरचना बदलणे भारताला भाग पडले असून संघाचा समतोल बिघडला आहे. कारण भारताकडे त्याची जागा घेऊ शकणारा दुसरा खेळाडू नाही. पुढील आठवड्यात होणार असलेल्या इंग्लंडविऊद्धच्या सामन्यापूर्वी पंड्या लखनौमध्ये संघात सामील होण्याची अपेक्षा आहे. सध्याच्या परिस्थितीत विश्वचषकात आतापर्यंत एकही सामना न खेळलेला वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीला आज संधी मिळेल हे निश्चित आहे. कारण येथील खेळपट्टी काही प्रमाणात वेगवान गोलंदाजांना अनुकूल असेल अशी अपेक्षा आहे.
फलंदाजीला बळ देण्यासाठी सूर्यकुमार यादव संघात येऊ शकतो. पण समतोल साधण्यासाठी भारत कोणाला पसंती देतो ते पाहावे लागेल. परिस्थिती पाहता शार्दुल ठाकूरची वर्णी लागायला हवी. रविचंद्रन अश्विन हा देखील चांगला पर्याय असला, तरी त्याची ऑफस्पिन येथे प्रभावी ठरेल का हे पाहावे लागेल. भारतीय फलंदाजी सध्या अत्यंत चांगली कामगिरी करत असून रोहित शर्मा, विराट कोहली, के. एल. राहुल आणि शुभमन गिल हे सारे फॉर्मात आहेत. गोलंदाजीमध्ये जसप्रीत बुमराह वेगवान माऱ्याचे चांगल्या प्रकारे नेतृत्व करत आहे, तर कुलदीप यादवने मधल्या षटकांमध्ये आपल्या युक्तीने प्रतिस्पर्ध्यांना धक्के देऊन दाखविलेले आहे. मोहम्मद सिराजनेही अपेक्षा पूर्ण केल्या आहेत.

एकदिवसीय विश्वचषकात भारत आणि न्यूझीलंड नऊ वेळा आमनेसामने आले आहेत. त्यात भारताने केवळ तीन वेळा, तर न्यूझीलंडने पाच वेळा विजय मिळवलेला आहे. यंदाच्या स्पर्धेत भारत आणि न्यूझीलंड हे दोन्ही संघ आतापर्यंत अपराजित राहिले असून त्यांनी चार सामन्यांमध्ये चार विजय नोंदवले आहेत. परंतु किवीज चांगल्या धावसरासरीमुळे गुणतालिकेत अव्वल स्थानावर आहेत. किवी संघ कर्णधार केन विल्यमसनशिवाय उतरेल. पण डेव्हॉन कॉनवे, रचिन रवींद्र आणि डॅरिल मिथसेल यांनी विल्यमसनच्या अनुपस्थितीचा फारसा परिणाम होऊ दिलेला नाही. विल यंगने देखील चांगली कामगिरी केलेली आहे. अनुभवी टीम साउदी नसला, तरी न्यूझीलंडकडे 11 बळी घेतलेला डावखुरा फिरकीपटू मिचेल सँटनर आणि मॅट हेन्री, लॉकी फर्ग्युसन व अनुभवी ट्रेंट बोल्ट या वेगवान त्रिकुटाचा समावेश असलेला चांगला मारा आहे.
संघ : भारत-रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, के. एल. राहुल, रवींद्र जडेजा, शार्दुल ठाकूर, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, कुलदीप यादव, मोहम्मद शमी, रविचंद्रन अश्विन, इशान किशन व सूर्यकुमार यादव.
न्यूझीलंड-केन विल्यमसन (कर्णधार), ट्रेंट बोल्ट, मार्क चॅपमन, डेव्हॉन कॉनवे, लॉकी फर्ग्युसन, मॅट हेन्री, टॉम लॅथम (उपकर्णधार), डॅरिल मिशेल, जिमी नीशम, ग्लेन फिलिप्स, रचिन रवींद्र, मिशेल सँटनर, ईश सोधी, टिम साउदी, विल यंग.
सामन्याची वेळ : दुपारी 2 वा.









