हृदयविकाराचा झटका, तरुण-तरुणींनीही गमावले प्राण
वृत्तसंस्था/ अहमदाबाद
गुजरातमध्ये अचानक वाढलेल्या हृदयविकाराच्या घटनांमुळे चिंता वाढली आहे. विशेषत: तरुण वर्ग हार्ट अॅटॅकचे बळी ठरत आहेत. राज्यात गेल्या 24 तासांत हृदयविकाराच्या झटक्याने 12 जणांचा मृत्यू झाला आहे. गेल्या काही दिवसांपासून राज्यात हृदयविकाराच्या झटक्याचे प्रमाण वाढत असल्याचे निदर्शनास आले आहे. त्यातही चिंतेची मोठी बाब म्हणजे किशोरवयीन मुले आणि तरुणींचेही बळी गेल्याची नोंद आढळून आली आहे.
राजकोटमध्ये एका 28 वषीय व्यक्तीचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला, तर राया रोडवर एका बिल्डरला हृदयविकाराचा झटका आला. त्याला तातडीने रुग्णालयात नेण्यात आले, मात्र त्याला डॉक्टरांनी मृत घोषित केले. अहमदाबादच्या हातीजानमध्ये गरब्यादरम्यान एका तरुणाचा मृत्यू झाला. याशिवाय द्वारका, ग्रेटर अंबाला आणि रामनगरमध्येही 3 तऊणांचा मृत्यू झाला आहे. सुरतमध्येही गेल्या 24 तासांत हृदयविकाराच्या झटक्याने दोघांचा मृत्यू झाला आहे. नवरात्रीच्या काळात तरुणांमध्ये हृदयविकाराच्या झटक्याचे प्रमाण वाढल्याने चिंतेमध्ये मोठी वाढ झाली आहे.
वडोदरातील हर्णी भागात गरबा खेळताना एका व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. दाभोईमध्येही एका 13 वषीय मुलाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला. नवसारी येथेही गरबा खेळताना एका तरुणाचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात आले. जामनगरमध्ये 24 वषीय रवी परबतभाई लुना यांना सौम्य तापाची लक्षणे आणि छातीत दुखत असल्याच्या तक्रारीनंतर त्यांना हृदयविकाराचा झटका आला. तर पिपली गावात अचानक हृदयविकाराचा झटका आल्याने ट्रकचालकाची प्राणज्योत मावळली. या चिंताजनक घटना पाहता, स्थानिक आरोग्य अधिकारी रहिवाशांना हृदयाच्या आरोग्याला प्राधान्य देण्याचे आवाहन करत आहेत.
गरबा आयोजकांसाठी नवी नियमावली
गेल्या काही दिवसांपासून हृदयविकाराच्या घटनांमध्ये वाढ झाल्यानंतर स्थानिक प्रशासनाने गरबा आयोजकांना प्रत्येक गरबा महोत्सवात ऊग्णवाहिका आणि वैद्यकीय पथके तैनात करण्यास सांगितले आहे. हृदयविकाराच्या वाढत्या घटनांमुळे वैद्यकीय क्षेत्राशी संबंधित लोकांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले आहे.
द्वारका येथे दोन शेतकऱ्यांचा मृत्यू
देवभूमी द्वारका जिह्यातील कंजारिया वेलजी रणमल (42) आणि रामजी दामजी नकुम (52) या दोन शेतकऱ्यांचाही मृत्यू झाला. वैद्यकीय अहवालात हृदयविकाराचा झटका हे प्राथमिक कारण असल्याचे सांगण्यात आले. द्वारका येथील नकुमच्या कुटुंबीयांनी हृदयविकाराच्या झटक्याचा दुजोरा दिला.









