सहाव्या दिवशीच्या वडगाव, भारतनगर, जुने बेळगाव भागातील दौडला उदंड प्रतिसाद : तरुणाईचा सळसळता उत्साह
बेळगाव : दुर्गामाता दौडीच्या सहाव्या दिवशी वडगाव, भारतनगर व जुने बेळगाव परिसरात उत्साही वातावरणात दौडचे स्वागत करण्यात आले. भगव्या पताका, छत्रपती शिवाजी महाराजांचा जयघोष, शिवचरित्रातील देखावे, पारंपरिक पोशाख यामुळे नागरिकांना साक्षात शिवशाहीची अनुभूती मिळाली. वडगावमधील दुर्गामाता दौड पाहण्यासाठी शिवभक्तांची मोठी गर्दी झाली होती. हजारोंच्या संख्येने शिवभक्त दौडमध्ये सहभागी झाले होते. तरुणाईचा सळसळता उत्साह दौडमध्ये पहायला मिळाला. सहाव्या दिवशीच्या दौडला बसवेश्वर सर्कल खासबाग येथील दुर्गा मंदिरापासून सुरुवात झाली. प्रारंभी दुर्गामातेची आरती झाल्यानंतर रुद्रकेसरी मठाचे श्री हरिगुरु महाराज यांच्या हस्ते ध्वज चढविण्यात आला. प्रेरणामंत्र म्हणून दौडला प्रारंभ झाला. भारतनगर, खासबाग, वडगाव, जुने बेळगाव, आनंदनगर, संभाजीनगर या परिसरात दुर्गामाता दौडीचे जल्लोषात स्वागत करण्यात आले. वडगाव परिसरात करण्यात आलेली सजावट आकर्षणीय ठरली. मंगाईनगर येथील मंगाईदेवी मंदिरात दौडची सांगता झाली. मंगाईदेवीची आरती झाल्यानंतर ध्येयमंत्र म्हणून डॉ. गिरीश सोनवलकर यांच्या हस्ते ध्वज उतरविण्यात आला. जय भवानी जय शिवाजींच्या घोषणांनी परिसर दणाणून निघाला होता. गल्लोगल्ली घालण्यात आलेल्या रांगोळ्या, केलेली सजावट, भगवे फेटे, सजीव देखावे यामुळे शुक्रवारची दौड महत्त्वाची ठरली.
रविवारी 22 रोजीचा दौडचा मार्ग
नाथ पै सर्कल शहापूर येथील अंबाबाई मंदिरापासून दौडला प्रारंभ होणार आहे. लक्ष्मी रोड, कारवारी गल्ली, गणेशपूर गल्ली, नवी गल्ली, डबल रोड, बसवेश्वर सर्कल, बाजार गल्ली, बनशंकरीनगर, मारुती गल्ली, बसवाण गल्ली, मरगम्मा गल्ली, वर्धाप्पा गल्ली, उप्पार गल्ली, संभाजी रोड, धारवाड रोड, जोशी मळा, संभाजी रोड, आचार्य गल्ली, गाडेमार्ग, पवार गल्ली, खडेबाजार, बसवाण गल्ली, गाडे मार्ग, सराफ गल्ली, बिच्चू गल्ली, आचार्य गल्ली, विठ्ठलदेव गल्ली, नार्वेकर गल्ली, पी. बी. रोड, होसूर बसवाण गल्ली, बोळमळ गल्ली, खडेबाजार, महात्मा फुले रोड, मीरापूर गल्ली, खडेबाजार, कचेरी गल्ली, हट्टीहोळ गल्ली, महात्मा फुले रोड, रामलिंगवाडी, आनंदवाडी, वडगाव रोड, अळवण गल्ली, खडेबाजार, मेलगे गल्ली, जेड गल्ली, भोज गल्ली, दाणे गल्ली, खडेबाजार, दाणे गल्ली, कोरे गल्ली, बसवेश्वर सर्कल गोवावेस येथे दौडची सांगता आहे.
हिरोजी इंदुलकर यांच्या वारसदारांची उपस्थिती
हिंदवी स्वराज्याचे बांधकाम प्रमुख व छत्रपती शिवाजी महाराजांचे विश्वासू मावळे सरदार हिरोजी इंदुलकर यांचे तेरावे वंशज संतोष सुभाष इंदुलकर दौडमध्ये सहभागी होणार आहेत. सोमवार दि.23 रोजी इंदुलकर यांचे वंशज सहभागी होणार असून मार्गदर्शन करणार आहेत.









