गुलालाच्या उधळणीने विद्यार्थ्यांचा जल्लोष : कॉलेज आवारात आनंदोत्सव
बेळगाव : आरसीयुतर्फे घेतल्या जात असलेल्या अंतिम वर्ष पदवी अभ्यासक्रमाच्या परीक्षा संपल्याने विद्यार्थ्यांनी एकच जल्लोष केला. शुक्रवारी बीएस्सी अभ्यासक्रमाच्या अंतिम वर्षाचा शेवटचा पेपर झाला. पदवीचे वर्ष संपल्याने विद्यार्थ्यांनी एकमेकांवर गुलाल उधळून आनंद साजरा केला. मागील पंधरा दिवसांपासून पदवी अभ्यासक्रमाच्या परीक्षा सुरू होत्या. बीए, बीकॉम, बीएस्सी यासह इतर अभ्यासक्रमांच्या परीक्षा टप्प्याटप्प्याने घेण्यात आल्या. शैक्षणिक आयुष्यातील पदवी हा एक महत्त्वाचा टप्पा असल्याने तो पूर्ण झाल्यानंतर विद्यार्थ्यांनी जल्लोष साजरा केला. आरपीडी कॉलेज परिसरात विद्यार्थ्यांनी गुलालाची उधळण करत सुटलो बाबा एकदाचे! असे म्हणत आनंद साजरा केला.









