मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांचे निवेदन : पर्वरी येथे विद्या समीक्षा केंद्राचे उद्घाटन
पणजी : राष्ट्रीय शिक्षण धोरणानुसार बालवाडी / केजी यांना नोंदणी करणे सक्तीचे करण्यात आले असून नोंदणी केली नाही तर बालवाडी / केजी चालवण्यास मिळणार नाही, असे निवेदन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी केले आहे. पर्वरी येथे विद्या समीक्षा केंद्राचे उद्घाटन केल्यानंतर ते बोलत होते. ते पुढे म्हणाले की, हे केंद्र सुरू होणे काळाची गरज होती आणि त्या केंद्रामुळे शिक्षण क्षेत्रात नवीन क्रांती घडणार आहे. गोव्यातील शिक्षणाची समीक्षा सदर केंद्रातून करण्यात येणार आहे. शिक्षण खाते किंवा संचालक पेडणे किंवा काणकोण येथील शाळांवर पर्वरीच्या मुख्य कार्यालयातून देखरेख कऊ शकत नाही, परंतु आता ती देखरेख या समीक्षा केंद्रातून करणे शक्य होणार आहे.
नव्या शैक्षणिक प्रयोगांचा लाभ विद्यार्थ्यांना
विद्यार्थी – शिक्षक यांच्या कामाची तुलना केंद्रातून करण्यात येणार आहे. आधुनिक तंत्रज्ञान वापऊन ते शक्य होणार आहे. शाळांच्या कामगिरीची समीक्षा केंद्रातून केली जाणार आहे. सरकारने कुशलतेला महत्त्व देऊन त्याला प्राधान्य देणारे अभ्यासक्रम सुऊ केले आहेत. राज्यात नवीन शैक्षणिक प्रयोग करण्यात येत असून त्याचा लाभ विद्यार्थ्यांना होणार असल्याची खात्री डॉ. सावंत यांनी दिली. गुजरातनंतर गोवा हे अशा प्रकारचे समीक्षा केंद्र सुऊ करणारे दुसरे राज्य आहे. जे विद्यार्थी शिक्षणात मागे राहतात त्यांना खास शिकवणी वर्ग घेऊन तयार करावे अशी सूचना डॉ. सावंत यांनी केली. जिल्हा, तालुका पातळीवर हे समीक्षा केंद्र शाळांचा अहवाल तयार करणार असून त्यातूनच शिक्षकांसह शाळांची प्रगती समोर येणार आहे. विद्यार्थी आव्हाने पेलण्यास तयार होतील आणि त्यांना भविष्यात संधी मिळतील, असा दावा डॉ. सावंत यांनी केला. या प्रसंगी पर्यटनमंत्री रोहन खंवटे, आमदार चंद्रकांत शेटये, शिक्षण संचालक शैलेश झिंगडे व उच्च शिक्षण सचिव प्रसाद लोलयेकर उपस्थित होते.









