वृत्तसंस्था /ओडेन्स, डेन्मार्क
भारताची डबल ऑलिम्पिकपदकविजेत्या पीव्ही सिंधूने येथे सुरू असलेल्या डेन्मार्क ओपन सुपर 750 बॅडमिंटन स्पर्धेत संघर्ष करीत महिला एकेरीची उपांत्यपूर्व फेरी गाठली. तिने जागतिक क्रमवारीत स्थानावर असणाऱ्या इंडोनेशियाच्या ग्रेगोरिया मारिस्का तुनजुंगला पराभवाचा धक्का दिला. माजी वर्ल्ड चॅम्पियन सिंधूने जिगरबाज खेळ करीत एका गेमची पिछाडी भरून काढत 18-21, 21-15, 21-13 अशी मात केली. 71 मिनिटे ही झुंज रंगली होती. गेल्या तीन भेटीत तुनजुंगने सिंधूला दोनदा हरविले होते. त्यात माद्रिद मास्टर्स अंतिम लढतीचाही समावेश आहे. मात्र सिंधूचे तिच्याविरुद्धचे रेकॉर्ड 8-2 असे भक्कम होते. ते आता 9-2 असे झाले आहे.
या मोसमात सिंधू खराब फॉर्ममधून जात असून हांगझाऊ आशियाई क्रीडा स्पर्धेतही तिला पदकाविना परतावे लागले होते. येथेही पहिल्या गेममध्ये ती 6-12 असे पिछाडीवर पडली तेव्हा आशा धूसर झाल्या होत्या. पहिला गेम तिने गमविल्यानंतर दुसऱ्या गेममध्ये मात्र तिने निर्धारी खेळ करीत मुसंडी मारली. तिने 13-4 अशी भक्कम आघाडी घेतली. मात्र तुनजुंगने सरळ आठ गुण घेत सिंधूला 14-14 वर गाठले. सिंधूने आपल्या सर्व्हिसवर दोन गुण घेत आघाडी घेतली आणि नंतर तिला सहावेळा गेमपॉईंट्स मिळाले. सिंधूने त्यापैकी एक वाया घालविल्यानंतर बसेलाईनवर अचूक फटका मारत तिने हा गेल जिंकत सामना निर्णायक सेटवर नेला.
तिसऱ्या गेममध्ये दोघींनी 3-3 अशी बरोबरी साधली होती. सिंधूने सरळ स्मॅश मारल्यानंतर नेटजवळून वाईड फटका मारला. फोरहँडच्या अनेक क्रॉस फटक्यामुळे सिंधूकडून चुका झाल्याने ती दबावाखाली आली आणि ती 5-9 अशी मागे पडली. पण तुनजुंगकडून झालेल्या चुकांचा लाभ घेत सिंधू तिच्या जवळ पोहोचले ब्रेकवेळी तुनजुंग फक्त एका गुणाने पुढे होती. नंतर सिंधूने झुंज देत 13-13 अशी बरोबरी साधली. बॅकलाईन व नेटजवळ तुनजुंगकडून अनेकदा चुका झाल्याने सिंधूने त्याचा लाभ उठवत झटपट 18-13 अशी झेप घेतली. रिव्हर्स ड्रॉपवर ती मॅचपॉईंटवर पोहोचली आणि सूर मारत तो वाचवला आणि तुनजुंगने परतीचा फटका नेटवर मारल्यानंतर सिंधूने जल्लोष सुरू केला.









