वृत्तसंस्था /बेंगळूर
ऑस्ट्रेलिया आणि पाकिस्तान यांची आज शुक्रवारी येथे होणार असलेल्या सामन्यात गांठ पडणार असून यावेळी आपल्या विश्वचषक मोहिमला नवसंजीवनी देण्यासाठी फलंदाजी आणि गोलंदाजीमध्ये त्यांना आपल्या ताकदीनुरुप कामगिरी करून दाखवावी लागेल. दबावाला तोंड देत निर्भयपणे क्रिकेट खेळण्याची पाकिस्तानात क्षमता आहे. पण या विश्वचषकात भारताविऊद्धच्या सामन्यात ते दडपणाखाली कोसळलेले आहेत. तर हैदराबाद येथे दुसऱ्या सामन्यात 345 धावांचा पाठलाग करण्यात ते जरी यशस्वी ठरलेले असले, तरी त्यास श्रीलंकेचा दर्जा नसलेला माराही कारणीभूत होता. ऑस्ट्रेलियाची स्थितीही चांगली नसली, तरी त्यांच्याविरुद्ध खेळताना पाकवर खरा दबाव येऊ शकतो. या दोन्ही संघांदरम्यान झालेल्या एकदिवसीय सामन्यांचा विचार करता ऑस्ट्रेलिया 69-34 असा, तर विश्वचषकात 6-4 असा आघाडीवर आहे. त्यामुळे पाकिस्तानला निर्भयपणे खेळावे लागेल आणि त्याची सुऊवात आघाडी फळीपासून होणे आवश्यक आहे. सलामीवीर इमाम-उल-हकने तीन सामन्यांत फक्त 63 धावा केल्या आहेत आणि या डावखुऱ्या फलंदाजाने फखर जमानची जागा घेतलेल्या अब्दुल्ला शफीकला अधिक भक्कम साथ देण्याची गरज आहे. सलामीवीर झमान आणि अष्टपैलू सलमान अली आगा हे आजच्या सामन्यासाठी उपलब्ध नसतील. कारण झमान गुडघ्याच्या दुखापतीतून सावरत आहे, तर आगा तापातून बरा होत आहे.
कर्णधार बाबर आझमच्या फॉर्ममधील चढ-उतारामुळे त्यांच्यासमोर आणखी एक समस्या निर्माण झाली आहे. वरील दोन्ही फलंदाजांना ऑस्ट्रेलियन संघाविऊद्ध मोठे योगदान द्यावे लागेल. मधल्या फळीत ते मोहम्मद रिझवानवर अतिप्रमाणात अवलंबून असून नेदरलँड्सविऊद्ध अर्धशतक झळकावलेला सौद शकील आणि इफ्तिखार अहमदने सातत्य दाखविण्याची गरज आहे. दुखापतग्रस्त वेगवान गोलंदाज नसिम शाहच्या अनुपस्थितीत पाकिस्तानचा 23 वर्षीय डावखुरा वेगवान गोलंदाज शाहीन शाह आपली सर्वोत्तम कामगिरी करून दाखवू शकलेला नाही. त्यांचा उपकर्णधार आणि लेगस्पिनर शादाब खान फलंदाजीत वा गोलंदाजीतही चमक दाखवू शकलेला नाही. त्यामुळे आज त्याच्या जागी लेगस्पिनर उसामा मीर खेळला, तर आश्चर्य वाटणार नाही. दुसरीकडे, भारत आणि दक्षिण आफ्रिकेविऊद्धच्या पराभवांमुळे ऑस्ट्रेलियाची स्थिती बिकट झाली असून आणखी एक पराभव त्यांच्या उपांत्य फेरीत पोहोचण्याच्या महत्त्वाकांक्षेला आणखी मागे टाकू शकतो. श्रीलंकेवरचा विजय हे एक लहान पाऊल असून त्यांना बाद फेरी गाठण्यासाठी मोठी मजल मारावी लागेल. ऑस्ट्रेलियावर ही स्थिती ओढवण्यामागे फलंदाज हे मुख्यत्वे दोषी आहेत. जोश इंग्लिसव्यतिरिक्त या स्पर्धेत इतर कोणत्याही फलंदाजाने अर्धशतक केलेले नाही आणि मार्नस लाबुशेन हा असा एकमेव फलंदाज आहे ज्याने एकूण 100 पेक्षा जास्त धावा केलेल्या आहेत. गोलंदाजीत स्टार्क, अॅडम झाम्पा आणि जोश हेझलवूड यांनी फलंदाजांना बांधून ठेवण्याचा प्रयत्न केलेला असला, तरी कर्णधार पॅट कमिन्सची गोलंदाजी अपेक्षेनुरुप झालेली नाही.
संघ-
ऑस्ट्रेलिया : पॅट कमिन्स (कर्णधार), स्टीव्ह स्मिथ, अॅलेक्स कॅरी, जोश इंग्लिस, सीन अॅबॉट, कॅमेरॉन ग्रीन, जोश हेझलवूड, ट्रॅव्हिस हेड, मार्नस लाबुशेन, मिचेल मार्श, ग्लेन मॅक्सवेल, मार्कस स्टॉइनिस, डेव्हिड वॉर्नर, अॅडम झाम्पा, मिचेल स्टार्क.
पाकिस्तान: बाबर आझम (कर्णधार), शादाब खान, फखर झमान, इमाम-उल-हक, अब्दुल्ला शफीक, मोहम्मद रिझवान, सौद शकील, इफ्तिखार अहमद, सलमान अली आगा, मोहम्मद नवाज, उसामा मीर, हॅरिस रौफ, हसन अली, शाहीन आफ्रिदी, मोहम्मद वसिम.
सामन्याची वेळ : दुपारी 2 वा.









