वाढीसोबत नफा 908 कोटींच्या घरात : सप्टेंबर तिमाहीत महसुलात तेजी
वृत्तसंस्था /नवी दिल्ली
एफएमसीजी क्षेत्रातील प्रमुख कंपनी नेस्ले इंडियाने सप्टेंबर तिमाहीत जबरदस्त कामगिरी केली आणि तिच्या निव्वळ नफ्यात 37 टक्के वाढ झाली आहे. महसुलात 9.4 टक्क्यांची वाढ नोंदवली गेली आहे. कंपनीने भागधारकांसाठी लाभांश जाहीर करण्यासोबत शेअर भांडवलात बदल करण्यासाठी स्टॉक स्प्लिटला मान्यता दिली असल्याची माहिती कंपनीने यावेळी दिली आहे. तिमाही निकाल पाहता, कंपनीचे समभाग हे गुरुवारी वाढीसह उघडले आणि 2 टक्क्यांच्या वाढीसह 23,524 रुपयांवर व्यवहार करत होते. नेस्ले इंडियाने गुरुवारी सांगितले की 30 सप्टेंबर 2023 रोजी संपलेल्या तिमाहीत त्यांचा एकत्रित निव्वळ नफा वार्षिक 37 टक्क्यांनी वाढून 908.1 कोटी रुपये झाला. कंपनीने 5,036 कोटी रुपयांचा महसूल सदरील अवधीत प्राप्त केला आहे. जो मागच्या वर्षी 4601 कोटी रुपयांचा होता. नेस्ले इंडियाचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक सुरेश नारायणन म्हणाले की, आम्ही आमच्या ब्रँड उत्पादनांच्या विकासासाठी गुंतवणूक करत आहोत. देशांतर्गत पातळीवर उत्पादनांना मागणी चांगली राहिली असून आम्ही 5,000 कोटी रुपयांच्या उलाढालीचा आकडा पार करत नवी उंची गाठली आहे. प्रति समभाग 140 रुपये लाभांशाची घोषणा कंपनीने केली आहे.









