कोल्हापुरातून व्ही.बी. तर हातकणंगलेतून प्रतिक पाटील यांना उमेदवारी देण्याची मागणी
कोल्हापूर प्रतिनिधी
राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाची बुधवारी मुंबई येथे लोकसभानिहाय आढावा घेण्यासाठी बैठक झाली. या बैठकीत शरद पवार गटाकडून कोल्हापूर आणि हातकणंगले या दोन्ही लोकसभा मतदारसंघावर दावा करण्यात आला. कोल्हापूरमधून जिल्हाध्यक्ष व्ही. बी. पाटील, तर हातकणंगलेमधून प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचे पुत्र व राजारामबापू सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष प्रतीक जयंत पाटील यांना उमेदवारी देण्याची एकमुखी मागणी शरद पवार यांच्याकडे करण्यात आली. लोकसभा मतदारसंघावर शिवसेना ठाकरे गट आणि काँग्रेसकडून दावा करण्यात आला असतानाच या बैठकीत दोन्ही मतदारसंघावर शरद पवार गटाकडूनही दावा करण्यात आला आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत मुंबईत पक्ष कार्यालयात लोकसभा मतदारसंघनिहाय आढावा बैठक घेण्यात आली. या बैठकीत कोल्हापूर, हातकणंगले, रावेर, बारामती, शिरूर, सातारा, माढा लोकसभा मतदारसंघांचा आढावा घेण्यात आला. या बैठकीत कोल्हापुरातील दोन्ही मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेस लढवत आली असून महाविकास आघाडीच्या जागावाटपातही हे दोन्ही मतदारसंघ राष्ट्रवादीकडेच घ्यावेत अशी विनंती उपस्थित पदाधिकाऱ्यांनी केली.
प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील म्हणाले, पक्षामार्फत केला जाणाऱ्या सर्व्हेमध्ये राष्ट्रवादीस व पवार साहेबांना मानणारा वर्ग मोठा असल्याचे निदर्शनास आले आहे. आजच्या या आढावा बैठकीत कोल्हापूर लोकसभा मतदार संघासाठी व्ही.बी. पाटील यांचे व हातकणंगले लोकसभा मतदार संघासाठी प्रतीक पाटील यांचे नाव सर्वांनी सुचवले असून त्याबाबतचे सर्व अधिकार पवार साहेबांकडे तेच निर्णय घेतील. त्यासाठी महाविकास आघाडीच्या जागा वाटपात या दोन्ही जागा राष्ट्रवादीस मिळतील यासाठी प्रयत्न करू असे आश्वासन पाटील यांनी दिले. यावेळी जिल्हाध्यक्ष व्ही.बी.पाटील यांनी मनोगत व्यक्त करून दोन्ही लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादीकडे उमेदवारी घेण्याची मागणी केली.
या बैठकीस खासदार सुप्रिया सुळे, श्रीनिवास पाटील, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, सरचिटणीस जितेंद्र आव्हाड, माजी मंत्री अनिल देशमुख, एकनाथ खडसे, आमदार बाळासाहेब पाटील, अशोक पवार, माजी कोषाध्यक्ष हेमंत टकले, राष्ट्रीय चिटणीस सिद्दीकी, प्रदेश सरचिटणीस बसवराज नागराळकर, प्रदेश सरचिटणीस अदिती नलावडे, महिला प्रदेशाध्यक्षा अॅड. रोहिणी खडसे, युवक प्रदेशाध्यक्ष मेहबुब शेख, युवती प्रदेशाध्यक्षा सक्षणा सलगर, अल्पसंख्याक विभाग प्रदेशाध्यक्ष जावेद हबीब, सी सेलचे प्रदेशाध्यक्ष राज राजापूरकर आदी उपस्थित होते.
कोल्हापुरातून शहराध्यक्ष आर.के.पोवार, माजी आमदार राजीव आवळे, अनिल घाटगे, सुनील देसाई, नितीन पाटील, गणेश जाधव, नितीन जांभळे, मदन कारंडे, महिला शहराध्यक्ष पद्मा तिवले, महिला जिल्हाध्यक्ष अश्विनी माने, गडहिंग्लजचे अमर चव्हाण, शिवाजी खोत, तालुकाध्यक्ष करवीर श्रीकांत पाटील, पंडित कळके, राजाराम कासार, गगनबावडा अध्यक्ष प्रकाश पाटील, कागल तालुकाध्यक्ष शिवानंद माळी, चंदगड तालुकाध्यक्ष शिवाजी सावंत, आजरा तालुकाध्यक्ष मुकुंद देसाई, शिरोळ तालुकाध्यक्ष विक्रमसिंह जगदाळे, अभिजित पवार, तानाजी आलासे, संदीप बिरणगे आदींसह बहुसंख्य पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.