कांद्याने आणले सर्वसामान्यांच्या डोळ्यात पाणी : जवारी बटाटा भाव प्रतिक्विंटल दोनशे रुपयांनी वाढ : आग्रा, इंदूर, बटाटा, रताळी भाव स्थिर
वार्ताहर /अगसगे
मार्केट यार्डमध्ये बुधवारच्या बाजारात कांदा आवकेत घट निर्माण झाल्याने कांदा दरात तब्बल दोन हजार रुपये प्रतिक्विंटल भाव वधारला. सर्सास भाव क्विंटलला 3000 पासून ते 4500 रुपये तर काही दुकानांमध्ये चुकून 4500 ते 5000 रुपये देखील भाव सवालामध्ये करण्यात आले. यामुळे यंदा पुन्हा कांद्याने सर्वसामान्यांच्या डोळ्यात पाणी आणले आहे. तर दुसरीकडे गृहिणींचे आर्थिक बजेट कोडमडले आहे. शेतकरीवर्ग भाव वाढल्याने आनंदी दिसत आहे. तालुक्यातील जवारी बटाट्याला गोवा, बेळगाव जिल्ह्यासह चेन्नई आणि हासनमधून मागणी आल्याने जवारी बटाटा भाव प्रतिक्विंटल दोनशे रुपयांनी वाढला. आग्रा, इंदूर, बटाटा आणि रताळ्याचा भाव क्विंटलला स्थिर आहे. देशभरातील बाजारामध्ये कांदा आवकेत घट निर्माण झाली आहे. आणि सोमवार दि. 16 ऑक्टोबरपासून महाराष्ट्रातील बाजारामध्ये कांदा भाव वाढण्यास प्रारंभ झाला आहे. याचाच परिणाम बुधवारी बेळगाव मार्केटयार्डमध्ये झाला आणि कांदा दर क्विंटलला दोन हजार रुपये एकदम भडकला. यामुळे खरेदीदारांमध्ये एकच खळबळ उडाली. आणि आपल्या गरजेपुरताच कांदा खरेदी करण्यात आला. शनिवारच्या बाजारात कांदा दर क्विंटलला 1000 पासून ते 2800 रुपये झाला होता. मात्र बुधवारी तोच कांदा भाव 2600 पासून ते 4500 रुपये झाला. तर काही दुकानांमध्ये चुकून काही कांद्यांचे भाव 4500 ते 5000 रुपये देखील करण्यात आले. यामुळे कांद्याचा दर तीनच दिवसात दुप्पटीने वाढला आहे. बुधवारी बाजारात महाराष्ट्र कांद्याचे 40 ट्रक आणि महाराष्ट्र कांद्याचे 25 ट्रक अशी एकूण 65 ट्रक कांदा विक्रीसाठी दाखल झाला असल्याची माहिती कांदा अडत व्यापाऱ्यांनी दिली.
पुन्हा शनिवारच्या बाजाराकडे व्यापाऱ्यांचे लक्ष
बेळगाव मार्केटयार्डमध्ये शनिवार आणि बुधवार असे केवळ दोन दिवस कांदा-बटाटा, रताळी बाजार असतो. या दोन दिवसामध्ये सवाल होतात. सध्या कांद्याचा भाव अर्धशतक गाठल्याने सर्वसामान्य नागरिकांचे आर्थिक बजेटवर परिणाम झाला आहे. तर दुसरीकडे कांदा उत्पादक शेतकरी आनंदी झाला आहे. यामुळे आता शनिवारच्या बाजाराकडे व्यापारी आणि खरेदीदारांचे लक्ष लागून आहे. सध्या बेळगाव-खानापूर तालुक्यातील जवारी बटाटा आवकेत दिवसेंदिवस वाढ होत आहे. बेळगाव जिल्ह्यासह गोवा, कारवार आणि परराज्यामध्ये बेळगाव जवारी बटाट्याला मागणी असते. कारण जवारी बटाटा खाण्यासाठी चवदार असतो व वेफर्स बनवण्यासाठी देखील याचा उपयोग केला जातो. शनिवारी जवारी बटाटा भाव क्विंटलला 200 रुपये ते 2200 रुपये झाला होता. आणि बुधवारी चेन्नई व हासनमधून मागणी वाढल्याने 200 ते 2500 रुपये भाव झाला. सध्या नवरात्र असल्याने परराज्यातील रताळ्याला उत्तरप्रदेश, मध्यप्रदेश, फरिदाबाद, गुडगाव, पंजाब, हरियाणा व महाराष्ट्रामध्ये मागणी अधिक आहे. बुधवारी रताळ्याची सुमारे दहा हजार पोती आवक झाली असून भाव स्थिर आहे, अशी माहिती रताळी व्यापाऱ्यांनी दिली.
महाराष्ट्र कांदा भाव
- गोळी-2400-2800 रु.
- मिडीयम-3000-3800 रु.
- मोठवड- 4000-4300 रु.
- गोळा-4200-4500 रु.
- काही ठिकाणच्या दुकानांतील भाव- 4500-5000 रु.
कर्नाटक कांदा भाव
- गोळा-2000-2500 रु.
- मिडीयम-3000-3500 रु.
- मोठवड-3800-4000 रु.
- गोळा-4000-4300 रु.
जवारी बटाटा भाव
- गोळा-200-250 रु.
- मिडीयम-800-1200 रु.
- मोठवड- 1700-2300 रु.
- गोळा-2200-2300 रु.
- गोवा क्वालीटी-2300-2500 रु.
इंदूर बटाटा भाव
- मिडीयम-1000-1500 रु.
- मोठवड-1600-1800 रु.
- गोळा-2200-2300 रु.
आग्रा बटाटा भाव
- मिडीयम-800-1000 रु.
- मोठवड-1300-1500 रु.
- गोळा-1600-1700 रु.
- रताळी-1000 ते 1700 रु.









