भडकलेल्या समर्थकांवर न्यायालय परिसरात लाठीमार
वृत्तसंस्था/ सिवान
बिहारच्या सिवानचे माजी खासदार मोहम्मद शहाबुद्दीनचा पुत्र ओसामा शहाबला न्यायालयाकडून मोठा झटका बसला आहे. न्यायालयाने ओसामाची 29 ऑक्टोबरपर्यंत न्यायालयीन कोठडीत रवानगी केली आहे. न्यायालयाच्या निर्णयानंतर ओसामाचे समर्थक भडकले आणि ते न्यायालय परिसरात गोंधळ घालू लागले होते. दुर्गापूजेनिमित्त न्यायालयीन सुटी सुरू झाल्याने 29 ऑक्टोबरपर्यंत न्यायालयाचे कामकाज होणार नाही.
ओसामाला खासगी वाहनात बसवून तुरुंगात नेण्यात यावे अशी मागणी त्याच्या समर्थकांनी केली होती. परंतु ही मागणी फेटाळत पोलिसांनी ओसामाच्या समर्थकांवर सौम्य लाठीमार केला आहे. पोलिसांनी ओसामा समवेत दोन आरोपींना राजस्थानात अटक केली होती. सोमवारी झालेल्या या कारवाईनंतर बिहारमधील राजकारण चांगलेच तापले आहे.
सिवानमधील छपिया गावात 6 ऑक्टोबर रोजी भूमी वादावरून गोळीबाराची घटना घडली होती. संबंधित भूमी मालक अभिषेक कुमारने याप्रकरणी पोलीस स्थानकात तक्रार नोंदविली होती. याप्रकरणी ओसामा, त्याचा सहकारी सलमान समवेत अन्य काही जणांच्या विरोधात एफआयआर नोंदविण्यात आला आहे.









