दोन जन्म प्रमाणपत्रांचे प्रकरण भोवले
वृत्तसंस्था/ रामपूर
उत्तरप्रदेशचे माजी मंत्री आणि समाजवादी पक्षाचे महासचिव आझम खान, त्यांच्या पत्नी डॉ. तजीन फात्मा आणि त्यांचे पुत्र अब्दुल्ला आझम यांना रामपूर (एमपी/एमएलए) न्यायालयाने प्रत्येकी 7 वर्षांची शिक्षा सुनावली आहे. तिन्ही दोषींची न्यायालयातून थेट तुरुंगात रवानगी करण्यात आली आहे. अब्दुल्ला आझम खानच्या दोन जन्म प्रमाणपत्रांप्रकरणी ही शिक्षा ठोठावण्यात आली आहे.
भाजप नेते आकाश सक्सेना यांनी 2019 मध्ये आझम खान, त्यांच्या पत्नी अन् मुलाच्या विरोधात तक्रार नोंदविली होती. अब्दुल्ला आझम यांच्या दोन जन्म प्रमाणपत्रांप्रकरणी तिघांनाही शिक्षा सुनावण्यात आली आहे. याप्रकरणी अब्दुल्ला आझम विरोधात गंज पोलीस स्थानकात गुन्हा नोंदविण्यात आला होता.
अब्दुल्ला आझम यांच्याकडे दोन जन्म प्रमाणपत्रं असून यातील एक जानेवारी 2015 मध्ये लखनौ पालिकेकडून मिळविण्यात आले होते, तर दुसरे जन्म प्रमाणपत्र रामपूरमधील असून ते 28 जून 2012 रोजी स्थानिक नगरपालिकेकडून प्रदान करण्यात आले होते. या जन्म प्रमाणपत्रांचा वापर वेळावेळी स्वत:च्या सुविधेनुसार करण्याचा आरोप आझम कुटुंबीयांवर होता.
अब्दुल्ला आझम खानवर पहिल्या जन्म प्रमाणपत्राच्या आधारावर पासपोर्ट मिळवून विदेशात प्रवास करण्याचा आणि दुसऱ्या जन्म प्रमाणपत्राचा वापर सरकारशी संबंधित स्वत:च्या उद्देशांसाठी करण्याचा आरोप आहे. दोन्ही प्रमाणपत्रं बनावट पद्धतीने आणि पूर्वनियोजित कटाच्या अंतर्गत जारी करण्यात आली होती. भाजप नेत्याच्या तक्रारीच्या आधारावर तिघांच्या विरोधात गुन्हा नोंदविण्यात आला होता.









