सेंट्रल प्रायमरी स्कूलची इमारत परत मिळविण्यासाठी पालक आक्रमक
बांदा केंद्रशाळेत पालकांचे शाळा बंद आंदोलन सुरु
मयुर चराटकर
बांदा
जिल्ह्यातील सर्वाधिक पटसंख्या अशी ओळख असलेल्या बांदा केंद्रशाळेत बेमुदत शाळा बंद आंदोलन सुरु आहे. सेंट्रल प्रायमरी स्कूलची चार वर्ग खोल्यांची इमारत शाळेला परत मिळावी यासाठी हे आंदोलन करण्यात येत आहे. पटसंख्या जास्त असल्याने जागा कमी पडत आहे. आंदोलनादरम्यान दरम्यान चर्चेसाठी आलेल्या उपशिक्षणाधिकारी प्रजापती थोरात यांना पालक व ग्रामस्थांच्या तीव्र रोषाला सामोरे जावे लागले. कार्यवाही नको, कारवाई करा अशी आग्रही मागणी करण्यात आली.
बांदा केंद्रशाळेत शेजारील गावातील मुलांचा भरणा असतो. या शाळेची तब्बल २८३ इतकी पटसंख्या आहे. या प्रशालेची चार वर्गखोल्यांचा एक खाजगी संस्था वापर करत आहे. सदर संस्थेचा आणि जिल्हा परिषदेचा भाडे करार संपुष्टात आला आहे. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी भाडेकरार संपलेली इमारत तात्काळ जिल्हा परिषद केंद्रशाळा बांदा नंबर १ च्या ताब्यात देण्याचे लेखी आदेश देऊनही प्राथमिक शिक्षण खात्याकडून कोणत्याही प्रकारची ठोस कार्यवाही न झाल्याने शाळा व्यवस्थापन समिती व पालकांनी शाळा बंद आंदोलन सुरु केले आहे.
या आंदोलन दरम्यान गटशिक्षणाधिकारी कल्पना बोडके यांनाही पालकांच्या रोषाला सामोरे जावे लागले. यावेळी शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष रत्नाकर आगलावे, माजी जि. प. सदस्य श्वेता कोरगावकर, माजी सभापती शीतल राऊळ, ग्रा. पं. सदस्य रुपाली शिरसाट, हेमंत मोर्ये, मंगल मयेकर, हेमंत दाभोलकर, दादू कविटकर, बाबा काणेकर, गुरु कल्याणकर, आबा धारगळकर, लक्ष्मी सावंत, हनुमंत सावंत, अक्षय मयेकर, सनी काणेकर, अरुण मोर्ये आदींसह पालक व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित आहेत. अद्यापही निर्णय झालेला नाही.









