टिळकवाडी, अनगोळ येथे जल्लोषात स्वागत : गल्लोगल्ली भगवी तोरणे, आकर्षक रांगोळ्या, शिवरायांचा जयघोष, बालचमूही सहभागी
बेळगाव : छत्रपती शिवाजी महाराज, संभाजी महाराजांच्या पराक्रमाची गाथा युवकांपर्यंत पोहोचविण्याचे प्रमुख माध्यम म्हणजे दुर्गामाता दौड. मंगळवारी टिळकवाडी व अनगोळ परिसर शिवमय झाला होता. शिवाजी महाराजांच्या नावाचा जयघोष, शिवाजी महाराजांची वेशभूषा केलेले बालचमू, सहभागी महिला यामुळे एक शिवमय वातावरण पाहायला मिळाले. पुरुष धारकऱ्यांसोबत महिलांचीही संख्या लक्षणीय होती. गल्लोगल्ली करण्यात आलेले स्वागत मंगळवारच्या दौडचे प्रमुख आकर्षण ठरले. मंगळवारी टिळकवाडी येथील शिवाजी कॉलनी येथून दौडला प्रारंभ करण्यात आला. छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीचे पूजन केल्यानंतर डॉ. दामोदर वागळे यांच्या हस्ते ध्वज चढविण्यात आला. टिळकवाडी येथून आरपीडी क्रॉस मार्गे भाग्यनगर व अनगोळ या परिसरात दौडचे जल्लोषात स्वागत करण्यात आले. अनगोळ येथील लक्ष्मी गल्ली महालक्ष्मी मंदिरात आरती करण्यात आली. सीपीआय परशराम पुजारी यांच्या हस्ते ध्वज उतरविण्यात आला. यावेळी हजारोंच्या संख्येने शिवभक्त उपस्थित होते.
गुरुवार दि. 19 रोजीचा दौडचा मार्ग
धर्मवीर संभाजी चौक येथून दुर्गामाता दौडला प्रारंभ होणार आहे. किर्लोस्कर रोड, रामलिंगखिंड गल्ली, अशोक चौक, बसवाण गल्ली, लक्ष्मी मंदिर, नरगुंदकर भावे चौक, गणपत गल्ली, कडोलकर गल्ली, बुरुड गल्ली, भातकांडे गल्ली, मेणसी गल्ली, आझाद गल्ली, टेंगीनकेरा गल्ली, भोवी गल्ली, बापट गल्ली, पांगूळ गल्ली, कामत गल्ली, पी. बी. रोड, मार्केट पोलीस स्टेशन, शेट्टी गल्ली, भडकल गल्ली, कोर्ट कॉर्नर, सरदार ग्राऊंड रोड, सन्मान हॉटेल, कॉलज रोड, यंदे खूट, किर्लोस्कर रोड, कडोलकर गल्ली, बापट गल्ली, संयुक्त महाराष्ट्र चौक येथे मारुती मंदिरात सांगता होणार आहे.









