सर्वत्र भगवेमय वातावरण : युवक-युवतींचा लक्षणीय सहभाग : दौडीचे ठिकठिकाणी स्वागत
वार्ताहर /किणये
तालुक्यात रविवारपासून दुर्गामाता दौडला मोठ्या उत्साहात प्रारंभ झाला. शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान यांच्यावतीने आयोजित या दौडला ग्रामीण भागातूनही उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. तालुक्याच्या विविध गावांमध्ये सुरू असलेल्या दुर्गामाता दौडच्या माध्यमातून नवचैतन्य निर्माण झाले आहे. मंगळवारी तिसऱ्या दिवशी विविध ठिकाणी झालेल्या दौडमध्ये भगवेमय वातावरण निर्माण झाले होते. किणये येथील शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान शाखेच्यावतीने दुर्गामाता दौडचे आयोजन करण्यात आले आहे. मंगळवारी तिसऱ्या दिवशीची दुर्गामाता दौड अमाप उत्साहात झाली. या दौडमध्ये गावातील बालचमूने मोठ्या संख्येने सहभाग घेतला होता. मुलामुलींनी पांढरा कुर्ता परिधान करून डोक्यावर टोपी व भगवे फेटे परिधान केले होते. यामुळे गावात उत्साहाचे वातावरण दिसून आले.
मंगळवारी छत्रपती शिवाजी महाराज चौक, गणेश मंदिर येथून दौडला प्रारंभ झाला. शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान किणये विभाग प्रमुख निवृत्ती डुकरे यांनी स्वागत केले. छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीचे पूजन शांताराम डुकरे यांच्या हस्ते करण्यात आले. गणेशमूर्तीचे पूजन नारायण पाटील व ध्वजपूजन मधू डुकरे यांनी केले. ‘छत्रपती शिवाजी महाराज की जय, जय भवानी जय शिवाजी, भारत माता की जय’ अशा घोषणा दौडमध्ये सहभागी झालेल्या धारकऱ्यांनी दिल्या. गल्ल्यांमध्ये भगव्या पताका लावण्यात आल्या. दुर्गामाता दौड स्वागतप्रित्यर्थ सर्वांनी आपापल्या घरासमोर आकर्षक रांगोळ्या काढल्या होत्या. औक्षण करून सुवासिनी दौडचे स्वागत करीत होत्या. याप्रसंगी ग्राम पंचायत सदस्य मारुती डुकरे, श्रीधर गुरव, देवेंद्र डुकरे, यल्लाप्पा गुरव आदींसह गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. पुंडलिक दळवी यांनी आभार मानले. बुधवारी लक्ष्मी मंदिर येथून दुर्गामाता दौडला प्रारंभ होणार आहे.
राकसकोप येथे दुर्गामाता दौड
बेळगुंदी विभाग यांच्यावतीने मंगळवारी राकसकोप गावात दुर्गामाता दौड काढण्यात आली. या दौडमध्ये पंचक्रोशीतील धारकऱ्यांची गर्दी दिसून आली. राकसकोप येथील जुना बसस्टॉप येथील दुर्गामाता मूर्तीचे पूजन करून दौडला सुरुवात करण्यात आली. दुर्गामाता मूर्तीचे पूजन लक्ष्मण गाडेकर यांच्या हस्ते करण्यात आले. शस्त्रपूजन भावकू मासेकर व सोमनाथ सुखये यांनी केले.कंग्राळ गल्ली मार्गे राकसकोप मेन रोड, पाटील गल्ली, पंचराशी गल्ली, नागराज गल्ली, विठ्ठल गल्ली, चव्हाट गल्ली येथून ही दौड छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे आली. या ठिकाणी ध्येयमंत्र व प्रेरणामंत्र म्हणण्यात आले. छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीचे पूजन ग्रामस्थ, पंच कमिटीचे अध्यक्ष विलास पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. या दौडमध्ये गावातील नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. याप्रसंगी विविध मान्यवरांची छत्रपती महाराजांच्या जीवनचरित्रावर आधारित भाषणे झाली.
कर्ले येथील दौड
कर्ले गावात सुरू असलेल्या दुर्गामाता दौडला गावकऱ्यांतून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. मंगळवारी तिसऱ्या दिवसाची दौड झाली. विठ्ठल रुखमाई मंदिर येथून दौडला सुरुवात करण्यात आली. प्रारंभी विठ्ठल रखुमाई मूर्ती पूजन केशव सांबरेकर व विठ्ठल देसाई यांच्या हस्ते करण्यात आले. शस्त्रपूजन सौरभ सांबरेकर व ज्ञानेश्वर पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. ही दौड ब्रह्मलिंग गल्ली व मरगाई गल्लीमध्ये काढण्यात आली. बुधवारी रवळनाथ गल्लीमध्ये दौड होणार आहे.
बाळेकुंद्री खुर्दमध्ये दौडला उत्स्फूर्त प्रतिसाद
सांबरा : बाळेकुंद्री खुर्द येथे श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान शाखेच्या वतीने आयोजित श्री दुर्गामाता दौडला दिवसेंदिवस उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. मंगळवारी पाटील गल्ली येथून प्रेरणामंत्राने दौडला सुरुवात करण्यात आली. त्यानंतर शिवाजी गल्ली, कलमेश्वर गल्ली, सुभाष गल्ली, आंबेडकर गल्ली, दुर्गादेवी मंदिर, लक्ष्मी नगर, मेन रोड, पेठ गल्ली, मठ गल्ली, बसवान गल्लीमार्गे पुन्हा दौड पाटील गल्ली येथे आल्यानंतर दौडीची ध्येयमंत्राने सांगता करण्यात आली. दौडीमध्ये विविध देवी देवतांच्या घोषणा देण्यात येत होत्या. तर विविध स्फूर्तीगीतेही गाण्यात येत होती. सर्वजण पारंपरिक भगवे पोशाख घालून दौडमध्ये सहभागी झाल्याने व दौड निघणाऱ्या मार्गावर भगव्या पताका व भगवे ध्वज लावल्याने अवघे गाव भगवेमय झाले होते. दौडीमध्ये मुलींची संख्याही अधिक होती. दौडीचे ठीकठिकाणी आरती ओवाळून स्वागत करण्यात आले.
दौडीची सोमवारी सांगता
यंदा बेळगाव शहरातील दौडीचे रौप्यमहोत्सवी वर्ष असल्याने शहरामध्ये मंगळवार दि. 24 रोजी दौड भव्य प्रमाणात साजरी करण्यात येणार आहे. यासाठी येथील श्री दुर्गामाता दौडीची सोमवार दि. 23 रोजी सांगता करण्यात येणार आहे व मंगळवार दि. 24 रोजी बेळगाव शहरातील दौडीमध्ये सर्वजण सहभागी होणार आहेत.









