राज्य पर्यावरण प्रदूषण नियंत्रण मंडळाचा आदेश
प्रतिनिधी/ बेंगळूर
राज्य सरकारने सामान्य फटाक्यांवर निर्बंध घालण्याची घोषणा केली आहे. यापाठोपाठ आता दिवाळीत केवळ हिरव्या फटाक्यांना (ग्रीन व्रॅकर्स) परवानगी देण्यात आली आहे. दिवाळीच्या कालावधीत हे फटाके केवळ 2 तासच फोडण्याची मुभा देण्यात आली आहे. कर्नाटक राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळाने यासंबंधीचा आदेश जारी केला आहे.
बेंगळूरमधील फटाके दुकान आणि गोदामाला लागलेल्या आगीत 16 जणांचा मृत्यू झाला होता. या घटनेची सरकारने गांभीर्याने दखल घेत सामान्य फटाक्यांचा वापर आणि विक्रीवर निर्बंध घालण्याची घोषणा केली होती. कमी आवाजाचे आणि कमी प्रदूषण होणाऱ्या हिरव्या फटाक्यांच्या वापराला मुभा असल्याचे सरकारने म्हटले होते. या पार्श्वभूमीवर पर्यावरण प्रदूषण नियंत्रण मंडळाने दिवाळी कालावधीत केवळ दोन तास फटाके फोडण्याची मुभा दिली आहे. 11 नोव्हेंबर ते 15 नोव्हेंबर या कालावधीत दिवाळी असून रात्री 8 ते 10 या वेळेत फक्त हिरवे फटाके फोडण्याची परवानगी दिली आहे.
सर्वोच्च न्यायालयाने 23 ऑक्टोबर 2018 आणि 31 ऑक्टोबर 2018 रोजी दिलेला निकाल तसेच वेळोवेळी दिलेल्या निर्देशांचे पालन केले जात आहे. या अनुषंगाने दिवाळीत केवळ हिरवे फटाके वगळता कोणत्याही फटाक्यांचा वापर आणि विक्रीवर बंदी आहे, असा उल्लेखही पत्रकात करण्यात आला आहे.









