वृत्तसंस्था/ लाहोर
पाकिस्तानात पॅलेस्टिनी विद्यार्थ्यांवर चाकूने हल्ला करण्यात आल्याची घटना घडली आहे. या हल्ल्यात दोन पॅलेस्टिनी विद्यार्थी जखमी झाले असून त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. स्थानिक गुंड विदेशी विद्यार्थ्यांना त्रास देत होते, या प्रकाराला विरोध केल्याने पॅलेस्टिनी विद्यार्थ्यांवर हल्ला करण्यात आला आहे.
पाकिस्तानच्या पंजाब प्रांतात ही घटना घडली आहे. पॅलेस्टिनी विद्यार्थी अब्दुल करीम अणि खल्दून अलशेख हे वैद्यकीय शिक्षण घेत आहेत. गुजरांवाला शहरात स्थानिक गुंडांकडून वैद्यकीय महाविद्यालयातील विद्यार्थिनींचे छेड काढली जात होती. अब्दुल आणि खल्दूनने विदेशी विद्यार्थिनींची छेड काढण्यापासून स्थानिक गुंडांना रोखले होते. याचमुळे या दोघांवर स्थानिक गुंडांनी चाकूने हल्ला केला आहे. पोलिसांनी याप्रकरणी संशयितांच्या विरोधात गुन्हा नोंद केला असला तरी अद्याप कुणालाच अटक केलेली नाही.









