कोल्हापूर प्रतिनिधी
कुऱ्हाड हे धनगर समाजाचे प्रतीक असून काठीऐवजी घोंगड्यासोबत कुराड घेऊनच अन्यायाविरोधात आवाज उठवण्याचे आवाहन भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी केले आहे. तसेच पवारांनी मुख्यमंत्री असताना संविधानात असलेलं एनटी आरक्षण काढून समाजाची दिशाभूल केली. धनगर समाजाचा सगळा रोष शरद पवारांच्या विरोधात असे सांगताना पहिल्या टप्प्यात आरक्षणासाठी न्यायालयीन लढाई आणि दुसऱ्या टप्प्यात रस्त्यावरची लढाई लढणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
भाजप नेते आमदार गोपीचंद पडळकर यांची धनगर जागर यात्रा आज कोल्हापुरात हातकणंगले तालुक्यातील पट्टणकोडोली येथे पार पडली. यावेळी बोलताना त्यांनी म्हटले आहे कि, “मराठवाडा, विदर्भ आणि आता पश्चिम महाराष्ट्रात धनगर जागर यात्रा येत आहे. 1960 पासून धनगर आरक्षणासाठी आम्ही प्रयत्न करतोय. दोन टप्प्यात धनगर आरक्षणाची लढाई सुरू असून पहिल्या टप्प्यात न्यायालयीन लढाई तर दुसऱ्या टप्प्यात आरक्षणासाठी रस्त्यावरची लढाई लढावी लागणार आहे. आरक्षणाचा निकाल धनगर समाजाच्या बाजूनेच लागेल. न्यायालयीन लढाईत अडचण आल्यास धनगर समाजाला रस्त्यावरील लढाई करावी लागणार आहे.” असेही आवाहन त्यांनी केले.
पुढे बोलताना त्यांनी, “धनगर समाजाची मागणी एसटी आरक्षण अंमलबजावणीची होती. मात्र शरद पवारांनी मुख्यमंत्री असताना संविधानात नसलेलं एनटी आरक्षण काढून धनगर समाजाची दिशाभूल केली. धनगर आरक्षणासाठी समाज जागृत होत असल्याची बाब शरद पवारांच्या लक्षात आल्यावर आपले राजकारण धोक्यात येईल अशी भिती शरद पवारांना वाटत होती. कोणत्याच राज्यात नसलेलं एनटीचं आरक्षण शरद पवारांनी धनगर समाजाला लागू केले. त्यामुळेच धनगर समाजाचे नुकसाना झाल्याने समजाचा पवारांच्या विरोधात रोष आहे.” असा आरोप पडळकर यांनी शरद पवारांवर केला.
आपल्या जाहीर सभेनंतर माध्यमांशी बोलताना आमदार पडळकर म्हणाले, “कुऱ्हाड हे धनगर समाजाचे प्रतीक आहे. काठीऐवजी घोंगड्यासोबत कुऱ्हाड घेऊन अन्यायाविरोधात आवाज उठवा. पुणे जिल्ह्यात अहिल्यादेवी होळकर यांचं मोठं स्मारक राज्य सरकार उभारणार असून येत्या दोन महिन्यांत धनगर आरक्षणाचा प्रश्न मार्गी लागेल. सांगली जिल्ह्यात 22 ऑक्टोबरला आरेवाडीला दसरा मेळावा होणार आहे. त्यासाठी लाखोंच्या संख्येने उपस्थित रहा.” असे आवाहन आमदार पडळकर यांनी केलं आहे.








