ठेकेदारावर वचक ठेवण्यात अपयशी ठरले; परशुराम उपरकरांचा निशाणा
कणकवली / प्रतिनिधी
महामार्गाच्या कामाच्या एकूणच दर्जाबाबत आम्ही सातत्याने आवाज उठवत आहोत. चिपळूण येथील पूल कोसळल्यानंतर ही बाब प्राधान्याने अधोरेखित झाली आहे. मुंबई गोवा महामार्ग चौपदरीकरण ठेकेदारावर वचक ठेवण्यात लोकप्रतिनिधी अपयशी ठरले आहेत. जनतेने निवडून दिलेल्या लोकप्रतिनिधींनी लोकांचे प्रश्न सोडविणे ऐवजी अडचण निर्माण करण्याचे काम केले. त्यामुळे भविष्यात काही दुर्घटना घडल्यास त्याला ठेकेदारासोबतच हे लोकप्रतिनिधी जबाबदार असतील असा आरोप मनसेचे सरचिटणीस तथा माजी आमदार परशुराम उपरकर यांनी केला आहे.
येथील संपर्क कार्यालयात पत्रकार परिषद बोलताना श्री उपरकर म्हणाले चिपळूण येथील बहादूर शेख नाका पूल काल कोसळला. या घटनेत सुदैवाने जीवित हानी झाली नाही. मात्र सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी डिसेंबर पर्यंत वाहतूक सुरू होणार असे सांगितले होते त्याचे काय झाले? सत्ताधारी आमदार नितेश राणे यांनी डिसेंबर पर्यंत कोणत्याही स्थितीत वाहतूक सुरू होणार असे वक्तव्य केले होते. मात्र चिपळूण येथे काम सुरू असताना ब्रिज कोसळल्याने नॅशनल हायवे कशाप्रकारे काम करते हे दिसून आले. खासदार विनायक राऊत यांनी चिपळूण येथे भेट दिल्यानंतर सदर कामाचे ऑडिट करणार असे सांगितले. मात्र कणकवली पूल कोसळल्यानंतर जे ऑडिट झाले त्याचे पुढे काय झाले हे अजून समजू शकलेले नाही. लोकप्रतिनिधी केवळ जनतेची दिशाभूल करत आहेत. त्यामुळे हायवेची आजची स्थिती व पूर्ण कामाला पालकमंत्री सत्तेतील आमदार खासदार हेच जबाबदार असल्याचे श्री उपरकर म्हणाले.









