मध्यरात्री तोडला कडीकोयंडा : शेतकरी कुटुंबाला फटका
बेळगाव : रामतीर्थनगर येथील एका बंद घराचा कडीकोयंडा तोडून चोरट्यांनी सुमारे दहा लाखांचा ऐवज लांबविला आहे. सोमवारी दुपारी 12 वाजण्याच्या सुमारास चोरीचा हा प्रकार उघडकीस आला आहे. या घटनेने परिसरात खळबळ माजली असून माळमारुती पोलीस स्थानकात घटनेची नोंद झाली आहे. निजलिंगप्पा गंगप्पा अंगडी यांनी फिर्याद दिली आहे. ते मूळचे भेंडीगेरी, ता. बेळगावचे. दीड वर्षांपूर्वी रामतीर्थनगर येथे घर बांधून बेळगावात रहायला आले. ते शेती करतात. नवरात्रोत्सवानिमित्त घटस्थापनेसाठी रविवार दि. 15 ऑक्टोबर रोजी दुपारी 12.30 वाजण्याच्या सुमारास आपल्या कुटुंबीयांसोबत ते भेंडीगेरीला गेले होते. त्यावेळी ही घटना घडली आहे.
निजलिंगप्पा गावी गेले त्यावेळी त्यांची मुलगी घरात होती. तिचे सासर रामतीर्थनगर परिसरातच आहे. सायंकाळी 6 वाजेपर्यंत ती घरात होती. 6 नंतर घराला कुलूप लावून मुलगी आपल्या सासरी गेली. सोमवारी दुपारी 12 वाजण्याच्या सुमारास निजलिंगप्पा गावाहून परतले. प्रवेशद्वार उघडून त्यांनी आपले वाहन व्हरांड्यात उभे केले. घरात प्रवेश करताच चोरीची घटना उघडकीस आली. कडीकोयंडा तोडून चोरट्यांनी घरात प्रवेश केला आहे. तिजोरी फोडून सुमारे 17 ते 18 तोळे सोने, 60 तोळे चांदी, 50 हजार रुपये रोख रक्कम असा एकूण सुमारे 10 लाख रुपयांचा ऐवज चोरट्यांनी पळविला आहे. घटनेची माहिती समजताच माळमारुतीचे पोलीस निरीक्षक जे. एम. कालीमिर्ची व त्यांच्या सहकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला.
तिघा चोरट्यांची छबी कैद
चोरट्यांचा माग काढण्यासाठी श्वानपथक व ठसेतज्ञांना पाचारण करण्यात आले. निजलिंगप्पा यांच्या कस्तुरी निवास या घराच्या पाठीमागे असलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात चोरट्यांची छबी कैद झाली असून मध्यरात्री दोननंतर मोटारसायकलवरून आलेल्या तिघा जणांनी हे कृत्य केल्याचे उघडकीस आले आहे. माळमारुती पोलीस पुढील तपास करीत आहेत.









